लग्नविधीसाठी निघालेल्या मोटारीची समोरून येणाऱ्या मालमोटारीशी धडक होऊन झालेल्या अपघातात नवरदेवासह त्याचा मित्र जागीच ठार झाला. या अपघातात अन्य चार जण गंभीर जखमी झाले. चौसाळय़ापासून पुढे पारगावजवळ दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला.
बीड शहरातील शाहूनगर भागात राहणाऱ्या सय्यद मोबीन सय्यद बशीर (वय २०) याचा विवाह गुरुवारी वाशी (तालुका भूम) येथील मुलीबरोबर सायंकाळी पाच वाजता होणार होता. त्यामुळे सकाळी मोटारीतून (एमएच २३ वाय. १८३०) मोबीनसह त्याचा मित्र शेख शोएब शेख शफीक (वय २३, रोशनपुरा), तसेच राजू पठाण, अयुब पठाण, शेख फेरोज, शेख इब्राहम शेख खलील व मोटारचालक वैभव देशमुख हे वाशीकडे निघाले होते. दुपारी एकच्या सुमारास चौसाळय़ापासून पुढे पारगावजवळ समोरून येणाऱ्या मालमोटारीशी धडक झाली. या अपघातात नवरदेव सय्यद मोबीन व शेख शोएब जागीच ठार, तर इतर चौघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अवघ्या पाच तासांपूर्वी नवरदेवाचा अपघाती मृत्यू झाल्याचे वाशी येथे लग्न समारंभात कळताच सर्वानाच धक्का बसला व नातेवाईक बीडकडे रवाना झाले. अपघातात मृत्यू झालेला शेख शोएब याचाही विवाह ठरला होता. काही दिवसांनी विवाह होणार होता. त्यापूर्वीच दोन्ही तरुणांवर काळाने झडप घातली. सायंकाळी दोघांचाही शोकाकुल वातावरणात दफनविधी झाला.

Story img Loader