फेब्रुवारी व मार्चमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व पडलेली गारपीट आणि गेल्या मे महिन्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्यामुळे सोलापूर जिल्हय़ात २० जणांचा बळी गेला, तर २५६ मोठी व १०६ लहान जनावरे दगावली. तर चार लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले.
दरम्यान, जिल्हय़ात गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने ३०५ कोटींची रक्कम मंजूर केली व रक्कम उपलब्ध करून दिली. परंतु त्यापैकी आजतागायत २७० कोटी ९१ लाख ६६ हजारांच्या रकमेचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. उर्वरित ३४ कोटींची मदत अद्यापि अदा करण्यात आली नाही. विविध सात तालुक्यांतील ४४ हजार ६०० शेतकरी नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यापासून वंचित आहेत.
जिल्हय़ात पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी, मंगळवेढा, सांगोला आदी तालुक्यांमध्ये गेल्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात गारपिटीसह वादळी वारे व अवकाळी पाऊस होऊन त्यात प्रचंड हानी झाली होती. गारपीट, अंगावर वीज कोसळणे, वादळी वाऱ्यामुळे घरे, शाळांच्या इमारतींच्या छतांवरील पत्रे उडून पडणे, विजेचे खांब, वृक्ष उन्मळून कोसळणे या वेगवेगळय़ा कारणांमुळे २० जणांचा बळी गेला होता. अशा नैसर्गिक आपत्तीत मरण पावलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना शासनाकडून प्रत्येकी दीड लाखाची मदत दिली जाते. जिल्हय़ातील सर्व २० मृतांच्या वारसदारांना शासकीय मदत अदा करण्यात आली आहे. लहानमोठय़ा मृत जनावरांच्या मालकांना १८ लाख ५४ हजार ४०० रुपयांची मदत मिळाली आहे. मृत व्यक्ती, जनावरे, घरांच्या पडझडीमुळे आपद्ग्रस्तांना एक कोटी १० लाख ६४ हजाराची मदत उपलब्ध झाली आहे.