परभणी जलतरणिकेत वडिलांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका सहा वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैंवी घटना रविवारी (२४ एप्रिल) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. हा मुलगा परभणी शहरातील क्रीडा संकुलाशेजारी असलेल्या जलतरणिकेत पोहायला गेला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परभणी येथील आनंदनगरात राहणाऱ्या धनंजय टेकाळे यांच्यासोबत अभिमन्यू हा त्यांचा मुलगा रविवारी सकाळी जलतरणिकेमध्ये पोहण्यासाठी आला होता. अभिमन्यु नेहमी आपल्या वडिलांसोबत पोहण्यासाठी येत असे. रविवारी नेहमीप्रमाणे तो पोहण्यासाठी गेला होता. डमरु बांधून अभिमन्यू पोहत होता. वडील धनंजय टेकाळे हेही जलतरणिकेत पोहू लागले.

मुलगा पोहता-पोहता अचानक दिसेनासा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी आरडाओरड केली. तिथे असलेल्या उपस्थितांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर तो तळाशी सापडला. मुलाला पाण्याबाहेर काढून सुरुवातीला शहरातील एका खासगी रुग्णालयात आणि तेथून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी अभिमन्युचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हेही वाचा : परभणीत पत्नी गाढ झोपेत असतानाच गळा दाबून हत्या, नंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

घटनेची माहिती कळताच निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, तहसीलदार संजय बिरादार यांनी जलतरणिकेकडे धाव घेतली. या घटनेनंतर मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of 6 year child while swimming with father in parbhani pbs