कराड : कराड शहरातील मुजावर कॉलनीत आठवड्यापूर्वी (दि. २५ ऑक्टोंबर) शरीफ मुल्ला यांच्या घरात सकाळच्यावेळी झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेतील गंभीर जखमी सुलताना शरीफ मुल्ला या ३३ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला.शरीफ मुल्ला यांच्या घरात झालेल्या स्फोटात लगतच्या पाच घरांचे व घटनास्थळावरील सहा दुचाकींचे नुकसान झाले. तर, शरीफ मुल्ला यांच्यासह त्यांची पत्नी, घरातील दोन लहान मुले व नजीकच्या घरातील अन्य तीन ते चार जण जखमी झाले होते.
दरम्यान, सातारा आणि पुण्याच्या फॉरेन्सिक चाचणी पथकाने घटनास्थळी पाहणी करून त्याचे नेमकेपणाने विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या गळतीमुळेच हा स्फोट झाल्याचे आत्तापर्यंत गृहीत धरले गेले. परंतु, फॉरेन्सिक चाचणी पथकाचा अहवाल आणि पोलिसांचा निष्कर्ष अधिकृतपणे समोर आलेला नाही. त्यामुळे ही स्फोटाची दुर्घटना संशयाच्या भोवऱ्यातच असताना, सुलताना मुल्ला यांच्या मृत्यूमुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.