राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सुभाष भानूदास देशमुख, असं या शेतकऱ्याचं नाव आहे. आत्मदहनाच्या प्रयत्नात हा शेतकरी गंभीररित्या भाजला गेला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे सुभाष देशमुख यांनी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. देशमुख हे साताऱ्याच्या कांदळगावचे रहिवासी होते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी देशमुख यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू असताना विधिमंडळाबाहेर हा प्रकार घडला होता.
राज्यात ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक गावांमध्ये शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. अनेक गावांमध्ये जनावरं दगावली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुले मागील अनेक दिवसांपासून विरोधक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, यासाठी मागणी करत आहेत. तसेच अधिवेशनात मदतीची केलेली घोषणा तुटपुंजी असल्याचा आरोप करत आहेत.

हेही वाचा : जालना : कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर टीका केली होती. राज्यातील शिंदे-भाजपा सरकार असंवेदनशील आहे. त्यांच्या कृत्यामुळेच राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप पटोले यांनी केला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाईची मागणीही त्यांनी केली होती.

Story img Loader