प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे शैक्षणिक मूल्यांकन करण्यासाठी आलेल्या त्रिसदस्यीय ‘नॅक’ समितीचे प्रमुख माजी कुलगुरू टी. सी. शिवशंकर मूर्ती यांचे मंगळवारी येथे आकस्मिक निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. प्रा. मूर्ती हे कर्नाटकातील मंगलोरहून येथे आले होते.
देशभरातील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांचा शैक्षणिक दर्जा निश्चित करण्यासाठी ‘नॅक’ ही स्वायत्त व स्वतंत्र संस्था बंगळुरू येथे कार्यरत असून, प्र. नि. महाविद्यालयाच्या मूल्यांकनासाठी प्रा. मूर्ती यांच्यासह डॉ. बॅनर्जी (कोलकाता) व प्रा. दीपककुमार वर्मा (झारखंड) यांची समिती गेल्या रविवारी नांदेडमध्ये आली होती. सोमवार व मंगळवारी आपले कामकाज करून हे सर्व सदस्य बुधवारी येथून हैदराबादला रवाना होणार होते.
येथील ‘सिटी प्राइड’ हॉटेलमध्ये थांबलेल्या या तीन सदस्यांतील प्रा. मूर्ती सकाळी खोलीबाहेर आलेच नाहीत. बाहेरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही आतून प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी खिडकीतून त्यांच्या खोलीत (२१५) प्रवेश केला. त्या वेळी प्रा. मूर्ती प्रसाधनगृहात कोसळलेल्या अवस्थेत दिसून आले. त्याच वेळी प्र. नि. महाविद्यालयाचे प्राचार्य व त्यांचे काही सहकारी तेथे आले होते. एका स्थानिक डॉक्टरांनाही तेथे लगेच पाचारण केले. पण प्रा. मूर्ती यांचे बऱ्याच तासांपूर्वी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यानंतर पोलिसांचे पथकही घटनास्थळी आले.
रात्री उशिरापर्यंत मूर्ती यांनी आपल्या इतर दोन सहकाऱ्यांशी येथील भेटीबाबत चर्चा केली. त्याच वेळी प्र. नि.च्या मूल्यांकन भेटीचा अहवालही तयार झाला. तत्पूर्वी हॉटेलच्या कक्षात भोजन करून रात्री साडेअकराला ते आपल्या खोलीत गेले. परंतु बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह बघायला मिळाल्याने सारेच सुन्न झाले. प्र. नि. कॉलेजमध्ये शोककळा पसरली. या दु:खद घटनेनंतर इतर दोन सदस्यांनी आवश्यक ते सोपस्कार दुपारी पूर्ण केले.
प्रा. मूर्ती हे म्हैसूरच्या विद्यापीठात वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक असताना २०१०मध्ये त्यांची कर्नाटकातील मंगलोर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली होती. या पदावरून ते अलिकडेच निवृत्त झाले. त्यांचे शैक्षणिक व प्रशासकीय योगदान लक्षात घेऊन त्यांना ‘नॅक’च्या पॅनेलमध्ये समाविष्ट केले गेले. दोनतीन दिवसांच्या वास्तव्यात त्यांची विद्वत्ता त्यांची चिकित्सक दृष्टी आणि वयाची पासष्टी ओलांडल्यावरही कामकाजातील उत्साह येथे दिसून आला होता, असे प्र. नि. कॉलेजच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रा. मूर्ती यांच्या निधनाचे वृत्त ‘नॅक’चे कार्यालय, मंगलोर विद्यापीठ तसेच नातेवाइकांना कळविण्यात आले. प्र. नि. महाविद्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यापीठाच्या नॅक ऑफिसर प्रा. वाणी लातूरकर यांनी हॉटेलमध्ये येऊन मूर्ती यांच्या निधनाची माहिती घेतली. नंतर प्रा. मूर्ती यांचे पार्थिव शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा