येथील विश्रामबाग-वारणाली परिसरातील एका घरात शुक्रवारी रात्री झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. पोलिस कर्मचारी विठ्ठल चव्हाण यांच्या घरी झालेल्या दुर्घटनेत त्यांची पत्नी, दोन मुले, विवाहित दोन मुली व दोन नातू अशा सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.
मालन विठ्ठल चव्हाण (वय ४६), सागर चव्हाण (वय २४), श्रावण चव्हाण (वय १९), प्रियांका युवराज देसाई (वय २३), समर्थ शिवराज राठोड (वय ८) यांचा शुक्रवारी जागीच मृत्यू झाला. तर विघ्नेश युवराज देसाई (वय अडीच वष्रे) व रोहिणी विलास राठोड (वय २७) यांचा शनिवारी पहाटे रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
येथील पोलीस नियंत्रण कक्षामध्ये नेमणुकीस असलेले विठ्ठल चव्हाण यांच्या मालकीचा विश्रामबाग-वारणाली येथे विद्यामंदिर गल्ली नं. ८ येथील संदीप अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट आहे. या घरी चव्हाण कुटुंबीय काल रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करीत असतानाच गॅस गळतीमुळे आग लागली. या आगीने तत्काळ गंभीर रूप धारण केल्याने गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत लगेचच मदतकार्यास सुरुवात केली. पण या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर रोहिणी राठोड आणि विघ्नेश देसाई हे गंभीर जखमी झाले होते. या दोघांचाही आज पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या सर्व मृतदेहांवर विठ्ठल चव्हाण यांच्या सोलापूर जिल्ह्य़ातील मूळ गावी अंत्यविधी करण्यात येणार आहेत.
गॅस सिलिंडरच्या स्फोटात सांगलीत सात जणांचा मृत्यू
येथील विश्रामबाग-वारणाली परिसरातील एका घरात शुक्रवारी रात्री झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला.
First published on: 04-05-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of seven people in gas cylinder blast