येथील विश्रामबाग-वारणाली परिसरातील एका घरात शुक्रवारी रात्री झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. पोलिस कर्मचारी विठ्ठल चव्हाण यांच्या घरी झालेल्या दुर्घटनेत त्यांची पत्नी, दोन मुले, विवाहित दोन मुली व दोन नातू अशा सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.
मालन विठ्ठल चव्हाण (वय ४६), सागर चव्हाण (वय २४), श्रावण चव्हाण (वय १९), प्रियांका युवराज देसाई (वय २३), समर्थ शिवराज राठोड (वय ८) यांचा शुक्रवारी जागीच मृत्यू झाला. तर विघ्नेश युवराज देसाई (वय अडीच वष्रे) व रोहिणी विलास राठोड (वय २७) यांचा शनिवारी पहाटे रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
येथील पोलीस नियंत्रण कक्षामध्ये नेमणुकीस असलेले विठ्ठल चव्हाण यांच्या मालकीचा विश्रामबाग-वारणाली येथे विद्यामंदिर गल्ली नं. ८ येथील संदीप अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट आहे. या घरी चव्हाण कुटुंबीय काल रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करीत असतानाच गॅस गळतीमुळे आग लागली. या आगीने तत्काळ गंभीर रूप धारण केल्याने गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत लगेचच मदतकार्यास सुरुवात केली. पण या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर रोहिणी राठोड आणि विघ्नेश देसाई हे गंभीर जखमी झाले होते. या दोघांचाही आज पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या सर्व मृतदेहांवर विठ्ठल चव्हाण यांच्या सोलापूर जिल्ह्य़ातील मूळ गावी अंत्यविधी करण्यात येणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा