नांदेड : कंधार शिवारातील विधी महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या मन्याड नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा रविवारी (२२ मे) दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची कंधार पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील विधी महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या नदी पात्रात रविवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारस सौरभ सतीश लोखंडे (वय १६, रा. विधी महाविद्यालया शेजारी) व त्याचा मित्र ओम राजू काजळेकर (वय १५ रा. गवंडीपार, कंधार) हे पोहण्यासाठी मन्याड नदीच्या पात्रात गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. तेथे मोठ्या प्रमाणात गाळही होता. त्यांना बरोबर पोहताही येत नव्हते. यामुळे ते पाण्यात बुडाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सौरभने शिवाजी कॉलेजमध्ये इयत्ता ११ वीची परीक्षा दिली होती, तर ओमने मनोविकास विद्यालयात इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती.
हेही वाचा : पुण्याच्या चासकमान, भाटघर धरणांत बुडून नऊ जणांचा मृत्यू
घटनेची माहिती त्यांच्या सोबत पोहण्यासाठी गेलेला बालाजी तुकाराम डांगे या युवकाने सौरभ आणि ओमच्या वडिलांना सांगितली. वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. परमेश्वर चौधरी, कृष्णा चौधरी, लक्ष्मण जोतकर यांच्या मदतीने दोन्ही मुलांचा शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह सापडले. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेमुळे कंधार शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.