वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करणारा आंतरराष्ट्रीय तस्कर संसारचंद (६०) याचा मंगळवारी जयपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. संसारचंद गेल्या काही दिवसांपासून फुप्फुसाच्या कर्करोगाने आजारी होता. १४ मार्चला अलवर येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्याची हजेरी होणार होती. त्यामुळे तिहारमधून त्याला अलवरला आणण्यात आले. सुनावणीनंतर त्रास होऊ लागल्याने संसारचंदला जयपुरातील एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
संसारचंद मूळचा राजस्थानातील सरिस्का व्याघ्र प्रकल्पानजीकचा रहिवासी होता. सरिस्कातील अनेक वाघ नामशेष करण्यामागे त्याचा मोठा हात होता. संसारचंदवर आठ राज्यांत ५५ पेक्षा अधिक वन्यजीवांच्या तस्करीची प्रकरणे दाखल होते. २००५ मध्ये त्याच्यावर अखेरचा गुन्हा दाखल झाला. यात ८३ बिबटय़ांची आणि ८२ पानमांजरांची कातडी विकल्याचा आरोप होता. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला पहिल्यांदा अटक झाली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर संसारचंदने वन्यजीवांच्या कातडी आणि हाडांच्या तस्करीचा सपाटा लावला. १९८० ते २००५ पर्यंत जगभरातील सर्वोच्च वन्यजीव अवयवांच्या तस्करांमध्ये त्याची गणना व्हायची.
तस्करीची आकडेवारी
४७० वाघ आणि २१३० बिबटय़ांचा व १०,५०० हून अधिक पानमांजर आणि कोल्ह्य़ाच्या कातडी व हाडांच्या व्यापाराची कबुली संसारचंदने दिली होती.