केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काल(शनिवार) जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, हा धमकीचा फोन एका आरोपीने कर्नाटकातील बेळगावमधील तुरुंगातून केल्याचे तपासात उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय, यामागे नेमकं कोण? तुरुंगातून फोन कसा काय केला जाऊ शकतो? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज(रविवार) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. नागपुरातील रेशिमबागेत आयोजित एका विशेष बैठकीसाठी ते आले होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नितीन गडकरींना धमकीचा आला होता. त्याचा आम्ही शोध घेतला आहे आणि तत्काळ असं लक्षात आलं की, हा फोन कर्नाटकातील बेळागावमधून आलेला आहे. यानंतर तत्काळा नागपूर पोलिसांनी बेळगाव पोलिसांच्या मदत घेतली आणि बेळगाव पोलिसांशी चर्चा करून, त्याचा शोध घेतला गेला. तेव्हा असं लक्षात आलं की, एक व्यक्ती तिथल्या जेलमध्ये आहे. त्या व्यक्तीने हा धमकीचा फोन केला आहे.”
याचबरोबर, आता त्याच्यापर्यंत मोबाईल कसा पोहचला?, “कोणाच्या माध्यमातून हे त्याने केलं आणि का केलं?, त्याचा पाठीमागे अजून कोणी आहे का? याची पडताळणी पोलीस विभाग करेन. कर्नाटक पोलीसही यामध्ये आम्हाला मदत करत आहे. याची सर्व माहिती आपल्या एका टीमने तपास केला आहे. मात्र जोपर्यंत यामगचा उद्देश लक्षात येत नाही, तोपर्यंत हा तपास सुरूच राहील. असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.”
याशिवाय, जेलमधून फोन कसा केला गेला? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर फडणवीस म्हणाले की, “कर्नाटक सरकार त्यासंदर्भात कारवाई करेल. त्याने जेलमधून फोन केलाय?, त्यानेच केलाय?, कसा केलाय?, अशा सगळ्या गोष्टींची पडताळणी सुरू आहे. प्राथमिकदृष्ट्या असं लक्षात येतंय की त्याच व्यक्तीने केला आहे. ”