मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंना धमकीचा निनावी फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीनंतर शिंदेंच्या ठाण्यातील आणि शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, असे वृत्त ‘एबीपी माझा’ या वाहिनीने दिले आहे.
“१९९२ च्या मुंबई दंगलीत तुम्ही होता, म्हणून…” शिंदे गटाचं बाळासाहेब ठाकरेंना भावनिक पत्र
स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीकेसीवर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याआधी मिळालेल्या धमकीनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयात महिनाभराआधी धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर धमकीचा फोनदेखील आला होता. पंढरपुरातील आषाढी वारीच्या वेळीही मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काही दिवसांपूर्वी नक्षल्यांकडूनही मुख्यमंत्र्यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आत्ता पुन्हा मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पीएफआयवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर मुख्यमंत्र्यांना ही धमकी मिळाल्याने त्या अनुशंगानेही या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.