ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची प्रकरण समोर आलं आहे. शेतीच्या वादातून ही धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातल्या निपाणी वडगाव येथील संतोष गायधने या व्यक्तीने १ मे रोजी आपण अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचं जाहीर केलं आहे. शेतीच्या वादामध्ये अण्णा हजार यांनी मध्यस्थी करून आपल्याला न्याय द्यावा यासाठी गायधने यांनी अण्णा हजारे यांना निवेदन दिलं होतं. गायधने यांनी अण्णा हजारे यांच्याकडे मदतीची मागणी केली होती, परंतु अण्णांनी माझ्या निवेदनाची दखल घेतली नाही असा आरोप करत, गायधने यांनी राळेगणसिद्ध येथे जाऊन अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचं सांगितलं आहे.
संतोष गायधने यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, शेतीच्या वादात आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळेच आम्ही अण्णांकडे गेलो. पण अण्णासुद्धा मॅनेज झाले. त्यामुळे मी राष्ट्रपती महोदयांकडे इच्छामरणाची याचिका दाखल केली आहे. आम्हाला न्याय देणं शक्य नसेल तर आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी याचिका मी दाखल केली आहे.
हे ही वाचा >> “अजित पवारांकडून माझ्या जिवाला धोका”, पुण्यातील भाजपा पदाधिकाऱ्याची पोलिसात तक्रार
गायधने म्हणाले की, मला न्याय मिळाला नाही तर मी १ मे रोजी राळेगणसिद्धी येथे जाऊन आत्मदहन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मी पत्रात तसं लिहिलं आहे असं म्हटलं जातंय, परंतु मी तसं करणार नाही. मी आत्मदहन करणार नाही, कारण मी भित्रा नाही. मी अण्णा हजारे यांची हत्या करणार आहे. १ मे रोजी मी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णांची हत्या करेन.