क्षुल्लक कारणावरून रविवारी धुळय़ातील मच्छीबाजार आणि माधवपुरा या भागांत उसळलेल्या दंगलीची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दंगलीतील मृतांची संख्या चारवर गेली असून ४८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह २०७ जण जखमी झाले असल्याचे पालकमंत्री सुरेश शेट्टी यांनी सोमवारी येथे सांगितले. दंगलग्रस्त भागात परिस्थिती नियंत्रणात असली तरी संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शहरास भेट देऊन दोन्ही समाजाच्या नेत्यांबरोबर चर्चा केली.
शहरात दंगलीनंतर दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता होती. पाचकंदील, आग्रारोड परिसरातील मुख्य बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. मच्छीबाजार, पालाबाजार, माधवपुरा, चर्नी रोड या भागांत शीघ्र कृती दलाची तुकडी आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. बससेवेच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.
पालकमंत्री शेट्टी यांनी विश्रामगृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. दोन्ही समाजातील नेते आणि ज्येष्ठ मंडळींच्या बैठकीत शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात चर्चा केली.
यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी दंगलीविषयी सविस्तर माहिती दिली. पोलीस गोळीबारात जखमी झालेले अब्दुल खलील अन्सारी (३०), असीम मोहम्मद शेख (३०), सईद पटेल रईस पटेल (१८), इम्रानअली करमअली (२५) यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कैलास वाघारे (४५), रिझवान अन्सारी (२३) हे गंभीर जखमी आहेत. गोळीबारात एकूण १३ जण जखमी असून एकाची प्रकृती खालावल्याने त्यास मुंबई येथे हलविण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, मोहाडी ठाण्याचे सहायक निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह ४८ पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले आहेत. ६२ जणांवर अद्यापही रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा सुरू केल्याची माहितीही शेट्टी यांनी दिली. या वेळी खा. प्रतापदादा सोनवणे, आ. अनिल गोटे, महापौर मंजुळा गावित, माजी मंत्री रोहिदास पाटील, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक धनंजय कमलाकर, जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे उपस्थित होते. सकाळी सर्वपक्षीय प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांशी चर्चा करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा