नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेवरून आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकारवर टीका केली जात आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
दरम्यान, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृतांचा आकडा ३५ वर गेला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. मृतांमध्ये १६ बालकांचा समावेश असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.
अशोक चव्हाण ‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणाले, “नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दुर्दैवी घटनेबाबत आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी आम्ही त्यांना रुग्णालयातील परिस्थितीबाबत विस्तृत माहिती दिली. रुग्णालयाची आरोग्यसेवा प्रभावी करण्यासाठी अनेक तात्कालिक व दीर्घकालीन उपाय सुचवले.”
“दोन्ही मंत्र्यांनी आमच्या भावना जाणून घेतल्या असून त्यावर लवकरात लवकर योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या रुग्णालयातील बळींची संख्या ३५ वर गेल्याची माहिती दिली. यामध्ये एकूण १६ बालकांचा समावेश आहे,” अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.