‘सव्वाचारशे बरोबर एक!’ अशी चर्चा सध्या लातूर मतदारसंघात रंगली आहे. निमित्त आहे काँग्रेसने जिल्ह्य़ात आतापर्यंत घेतलेल्या सव्वाचारशे सभा व भाजपकडून बुधवारी (दि. ९) आयोजित नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या रुपाने मिळणाऱ्या जोरदार प्रत्युत्तराचे.
भाजपपेक्षा प्रचारात काँग्रेस सवाई असली, तरी जिल्हाभरात प्रचारयंत्रणा तोकडी असतानाही ‘मोदी’मय वातावरणामुळे काँग्रेसच्या नाकीनऊ येत असल्याची महायुतीच्या कार्यकर्त्यांतील चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची केली असून, जिल्हय़ात काँग्रेस-राष्ट्रवादी गळय़ात गळे घालून, मतभेद विसरून कामाला लागले आहेत. लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत आतापर्यंत ४२५पेक्षा अधिक सभा झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर व अशोक चव्हाण,  वैशालीताई देशमुख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज देशमुख, आमदार अमित देशमुख, दिलीपराव देशमुख, वैजनाथ िशदे, बाबासाहेब पाटील, शंकर धोंडगे, बसवराज पाटील मुरूमकर, माजी आमदार विनायकराव पाटील या प्रमुखांसह अनेक नेत्यांचा यात समावेश आहे.
संपूर्ण मतदारसंघ दोन वेळा िपजून काढण्यात आला. त्यामुळे काँग्रेसच्या मंडळींचा विश्वास वाढला. याउलट भाजपची प्रचारयंत्रणा उशिरा कामाला लागली व तीही अतिशय विस्कळीत काम करीत आहे. पण लोकांमध्ये फारशी नाराजी दिसून आली नाही. काँग्रेसला धडा शिकविण्याची ही नामी संधी असून मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपचा उमेदवार निवडून दिला जाईल, असे कार्यकर्ते ठासून सांगत आहेत. ग्रामपंचायत, सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, साखर कारखाने, पतसंस्था, सहकारी बँका अशा विविध माध्यमातून काँग्रेसची ग्रामीण भागावर पकड आहे. मात्र, या सत्तेचे लाभ विशिष्ट मंडळींनीच घेतले, याचा सुप्त राग ठिकठिकाणी व्यक्त होतो. पावलोपावली छोटय़ा-मोठय़ा प्रश्नांवर लोकांची नाडवणूक होते, याचा उद्रेक दाखविण्याची संधी मतदार उठवतील, असे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा