चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संदीप रणदिवे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर नेमके किती कर्ज होते, हे अद्याप समजू शकलेले नाही.
ब्रम्हपुरी तालुक्यात आवळगाव येथील शेतकरी संदीप रणदिवे यांच्या डोक्यावर कर्ज होते. त्यांच्याकडे फक्त एक एकर शेती होती. सततच्या नापिकीमुळे ते हताश झाले होते. याच विवंचनेतून त्यांनी 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी शेतातच गळफास घेत आत्महत्या केली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने रणदिवे कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.
दरम्यान, राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर करुनही तसेच विविध सरकारी योजना सुरु करुनही शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. विदर्भात गेल्या वर्षभरात एक हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशीम या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक आत्महत्या बुलढाण्यात झाल्या असून या जिल्ह्यात ३०० शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली होती.