सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे विकेंद्रीकरण करून नागरिकांना वेगवेगळ्या कारणांसाठी लाभ मिळवून देण्याचे काम स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने देशभर सुरू असून त्यात महाराष्ट्रातील जिल्ह्य़ांचाही समावेश आहे. एकाच ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यापेक्षा छोटे छोटे प्रकल्प उभारून त्याचा फायदा त्या भागातील नागरिकांना किंवा संस्थेला मिळवून देण्याची संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर राबवणाऱ्या संस्थांनी तयार केली आहेत. हीच विकेंद्रीकरणाची संकल्पना महाराष्ट्रात बंगळुरूच्या कन्सॉटिअम फॉर डिव्ॉटस् डिसेमिनेशन(सीडीडी) सोसायटीच्यावतीने उभी करण्यात आली असून शेकडो नागरिक व संस्था प्रकल्पांचा लाभ घेत आहेत. काही प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ‘डिसेंट्रलाईज वेस्ट वॉटर ट्रिटमेंट सिस्टम्स’ (डीईडब्लूएटीएस) असे या प्रकल्पांना म्हटले जाते.
सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने निर्माण होणाऱ्या अनेक समस्या आणि त्यावर मात करून पाण्याच्या पुनर्वापरावर संशोधने सुरू आहेत. सांडपाण्यासंबंधी जगभर होणारी कामे आणि त्यासंबंधीच्या नवीन तंत्रज्ञानावर विचार करण्यासाठी नागपुरात चौथी तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद सुरू आहे. एकच विशाल प्रकल्प उभारण्यापेक्षा शाळा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, कत्तलखाने, रुग्णालये किंवा कंपन्यांमधील पाण्याची गरज भागवण्यासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर शक्य असल्याचे बंगळुरूच्या सीडीडी सोसायटीने नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई भागात करून दाखवले आहे. त्याची माहिती सोसायटीच्या सुश्मिता सिन्हा यांनी दिली.
नागपूर आणि कोल्हापूर महापालिका व नगर परिषदांच्या मदतीने उभारण्यात आलेले हे प्रकल्प आहेत. नागपूरच्या सोमलवाडा भागात महाजननगरातील २०० घरांसाठी महापालिकेने पुढाकार घेऊन सांडपाण्याच्या पुनर्वापरास उपयोगी ठरेल असे युनिट उभारले आहे. त्यात नवीन भाजीबाजारात सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी प्रकल्प उभारण्यात आला आहे. कळमेश्वर नगर परिषदेच्यावतीने प्रकल्प उभारण्यात आला आहे. याशिवाय, उमरेड आणि इतवारी बाजारातील कत्तलखान्यांसाठीही या सांडपाण्याचा उपयोग करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. काटोलमध्ये दोन प्रकल्प सीडीडीच्या नागपूर शाखेच्यावतीने प्रादेशिक कार्यालयामार्फत उभारले जात असून ते येत्या डिसेंबपर्यंत पूर्ण होतील. या दोन्ही प्रकल्पांतर्गत बुधवारपेठेतील शाळा क्रमांक तीनमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह आणि काटोलच्या पशुचिकित्सा रुग्णालयामागे सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी प्रकल्प उभारण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ातील पांढरकवडा नगर परिषदेच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पाचा सार्वजनिक स्वच्छतागृहांबरोबरच ५० घरांना उपयोग होईल. पांढरकवडय़ाचेही काम येत्या डिसेंबपर्यंत पूर्ण होण्याचे आश्वासन सीडीडी सोसायटीच्या नागपूर शाखेच्यावतीने देण्यात आले आहे. कोल्हापूरमधील आयसोलेशन रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी, राजेंद्रनगरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी आणि सलोखे उद्यानाच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी डीईडब्लूएटीएसने तीन प्रकल्प उभारले आहेत. सूक्ष्म मध्यम उद्योगांतर्गत मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) प्रकल्पावरही सीडीडी सोसायटी काम करीत असून हा प्रकल्प जानेवारी २०१३ मध्ये पूर्ण होईल, असे आश्वासन देण्यात आले.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या विकेंद्रीकरणासाठी प्रयत्न
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे विकेंद्रीकरण करून नागरिकांना वेगवेगळ्या कारणांसाठी लाभ मिळवून देण्याचे काम स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने देशभर सुरू असून त्यात महाराष्ट्रातील जिल्ह्य़ांचाही समावेश आहे.
First published on: 22-11-2012 at 07:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decentralisation of drain water treatment project