परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पंचविसाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्षात आपली दिशा व ध्येय स्पष्ट असून, सर्व समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. तथापि राजकारण आणि कंत्राटदारी यांची गल्लत करू नका. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी गुत्तेदारी करू नये आणि ज्यांना कंत्राटदारी करायची आहे त्यांनी राजकारण करू नये. दोन्हीपैकी काय स्वीकारायचे याचा विचार करा. एकाच वेळी दोन्हीही करू नका, अशी स्पष्ट सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केल्या. ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार हे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर होते. या वेळी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना, त्यांनी पक्षवाढीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या. या वेळी माजी मंत्री नवाब मलिक, आमदार विक्रम काळे, राजेश विटेकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची सदस्यनोंदणी सर्व भागांत केली जावी. यात सर्व समाजाच्या लोकांचा सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्त करून जातीय सलोखा राखण्याचे काम झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व वाढले असून, शेती क्षेत्रात या तंत्राचा अवलंब उत्पादनवाढीसाठी केला जात आहे. उसासोबतच अन्य पिकांसाठीही हे तंत्रज्ञान महत्त्वाचे राहणार आहे. भविष्यात या तंत्राचा अवलंब शेतीसाठी करण्यात यावा. शून्य टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जात आहे. मात्र, ते थकवले, तर बारा टक्क्यांनी व्याज आकारले जाईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी नवाब मलिक, राजेश विटेकर यांचे भाषण झाले.
नृसिंह पोखर्णी येथून आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पवार यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार संजय जाधव, डॉ. राहुल पाटील, राजेश विटेकर, रत्नाकर गुट्टे या आमदारांसह जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आदी उपस्थित होते. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना नियोजन समितीमार्फत विकासकामांसाठी निधी दिला जातो. चुकीच्या पद्धतीने या निधीचा विनियोग झाला, तर जिल्हाधिकाऱ्यांनाही सोडणार नाही, असा इशारा या वेळी पवार यांनी बैठकीत दिला. बैठकीनंतर महापालिकेचीही आढावा बैठक पवार यांनी घेतली. या वेळी लोकप्रतिनिधींसह मनपा आयुक्त उपस्थित होते.
शहर जिल्हाध्यक्षपदी अल्पसंख्य चेहरा देण्यात यावा-प्रताप देशमुख
आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपद होते. आता हे पद आमदार राजेश विटेकर यांच्याकडे असल्याने सामाजिक समतोल राखण्यासाठी परभणीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अल्पसंख्य चेहरा देण्यात यावा. राष्ट्रवादी काँग्रेसने अल्पसंख्य समाजाला जिल्ह्यात सातत्याने सत्तेत वाटा दिला आहे. परभणी शहर अल्पसंख्याकबहुल असल्याने पक्षनेतृत्वाने ठरवल्यास आगामी काळात अल्पसंख्य व्यक्ती महापौरही होऊ शकते, असे मत शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.