राज्यातील गारपीटग्रस्तांना शासनाच्या वतीने पुढील आठवडय़ात नुकसान भरपाईबाबत निर्णय घेण्यात येईल असे मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यात गारपिटीने हजारो कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या दहा दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात गारपिटीमुळे १४ लाख हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांचे म्हणजेच द्राक्ष, डाळिंब, किलगड आदी पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक सर्वेक्षणानुसार गारपिटीमुळे शेतक-यांची एक हजार कोटींहून अधिक वित्तहानी झाली आहे. ही सर्व माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केंद्र सरकारला सादर करणार असून केंद्र शासनानेही स्वतंत्रपणे पथक पाठवून नुकसानीची पाहणी केली आहे.
गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या शेतक-यांना केंद्र शासनाकडून मिळणारी मदत आणि राज्य शासनाकडूनही मिळणारी मदत एकत्रित करून नुकसानग्रस्तांना भरीव भरपाई देण्याचा निर्णय शासन पुढील आठवडय़ांपर्यंत घेईल. कोणत्याही स्थितीत शासन शेतक-यांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी संयुक्तपणे विरोधकांचा सामना करण्यास समर्थ आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना आघाडीचाच धर्म पाळण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. या वेळी गमतीजमती चालणार नाहीत, असे सांगितले असल्याने सांगलीतील काँग्रेस उमेदवाराला चांगले मताधिक्य मिळणार असे सांगून डॉ. कदम म्हणाले, की विरोधकांनी केवळ टीका करण्याऐवजी कोणती कामे केली याचा जाब जनतेला द्यावा.

Story img Loader