महापालिका निवडणुकीत उतरायचे की नाही हे आम आदमी पक्षाने अजून ठरवले नसले, तरी पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत ही निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय होणार आहे. राज्यस्तरावर हा निर्णय घेणे तांत्रिक बाबीमुळे शक्य नसल्याचे पक्षाचे नेते सुभाष वारे यांनी सांगितले. आपची कार्यकारिणी निवडून आलेली नाही. तसेच अंतर्गत निवडणूक प्रक्रिया परिपूर्ण नसल्यामुळे राष्ट्रीय परिषदेतच निवडणुकीचा निर्णय होऊ शकेल, असे वारे म्हणाले.
तयारी असेल तरच निवडणुकीत उतरायला हवे, असे पक्षातील ज्येष्ठ सदस्यांना वाटते. मात्र, कार्यकर्त्यांच्या मनात दिल्ली विधानसभा निवडणुकीचा विजय असल्याने ते उत्साहात आहेत. दरम्यान, आपने पुढाकार घेतल्यास डावे पक्षही त्यांना समर्थन देण्याच्या विचारात आहेत. मात्र, आम आदमी पक्षाचा धोरणात्मक निर्णय न झाल्याने डाव्या पक्षांबरोबरची बोलणी उशिराने होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत काही महत्त्वाचे प्रश्न हाती घेऊन सीपीआय निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहे. अन्य समविचारी पक्षांशी बोलणीही सुरू आहे. विशेषत: आपने पुढाकार घेतला तर अन्य पक्षांनी त्यांना मदत करावी, अशी भूमिका असल्याचे भाकपचे भालचंद्र कांगो यांनी सांगितले. लवकरच या अनुषंगाने बैठक होणार आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवताना आम आदमी पक्षाने अधिक मेहनत घेतली, होमवर्कही चांगले होते. तसा गृहपाठ परिपूर्ण नसल्याने नक्की काय करावे या विषयीची चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे.

Story img Loader