लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली: तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी पुत्राला मिळणार की मला याचा निर्णय पक्ष श्रेष्ठीच घेतील असे मत आ. सुमनताई पाटील यांनी बुधवारी सांगलीत व्यक्त केले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली याबाबत आम्ही रस्त्यावर न उतरता तासगाव, कवठेमहांकाळ येथे निवेदन देऊन या कृतीचा निषेध केला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.
मुंबईमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय विधायक संमेलनाची माहिती देण्यासाठी आ. श्रीमती पाटील आज सांगलीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभेची उमेदवारी रोहितला की तुम्हाला असा थेट सवाल केला असता त्या म्हणाल्या, याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील. प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांना चौकशीसाठी ईडीने बोलावले होते. या विरोधात सांगली, विटा, कडेगाव आदी ठिकाणी पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. मात्र, तासगाव, कवठेमहांकाळमध्ये निदर्शने करण्यात आली नाहीत याकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, आम्ही या कृतीचा निवेदन देउन निषेध केला आहे.
स्व. आरआर आबा हे सर्वांचीच कामे करत होते. अगदी विरोधकांचीही कामे त्यांनी त्याच तडफेने व आत्मियतेने केली. मात्र, आम्हाला विकास कामासाठी झगडावे लागत आहे. मतदार संघातील गावांना सिंचन योजनांचे पाणी पैसे भरूनही मिळत नाही. यासाठी गेली दोन महिने जलसंपदा विभागाशी संपर्क साधला, मात्र, दाद मिळत नाही. पाणी सोडले तर गावतलावात पोहचेपर्यंत मागे कोणी तरी बंद करते. यामुळे येत्या आठ दिवसात जर पाणी आले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही दिला असल्याचे त्यांनी सांगितले.