विजय पाटील, कराड

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कराड : सर्वोच्च न्यायालयात यापूर्वी दोनदा मराठा आरक्षण टिकले नाही. आता ते शाश्वत टिकवायचे असल्यास काही वेळ द्यावा लागेल आणि तो वेळ मनोज जरांगे-पाटलांनी देण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी केले. राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यास वचनबध्द असल्याची ठाम ग्वाही तटकरे यांनी दिली.

कराड विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी त्रुटी दुरुस्ती करण्यासह कायदेशी बाबींच्या पूर्ततेसाठी कालावधी लागणार आहे. किमान महिना, दिड महिना मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास वेळ लागू शकतो. राज्य सरकार फेब्रुवारीअखेर याबाबतचा निर्णय करेल तरी दरम्यानचा वेळ देण्यासाठी जरांगे- पाटलांनी आपले आंदोलन स्थगित करावे.

हेही वाचा >>> ‘मंदिर वहीं बनायेंगे’ म्हणणाऱ्यांनी मंदिराची जागा का बदलली ? शरद पवारांचा सवाल

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे राज्यात ४५ हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय घटक पक्षांचे नेते एकत्र बसून सखोल चर्चेअंती जानेवारीअखेरीस घेतील. तर, दिल्लीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय १५ फेब्रुवारीपर्यंत होईल असे तटकरे यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने कर्जतच्या शिबिरात अजित पवारांनी रायगड, सातारा, शिरूर आणि बारामती या जागा मागितल्या आहेत. त्यावर महायुतीच्या बैठकीतच निर्णय होईल. महायुतीतील कोणीही लोकसभा जागांबाबत वक्तव्य न करण्याचे नुकत्याच झालेल्या बैठकीत ठरल्याचे तटकरे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार या काका-पुतण्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडत असताना, रोहित पवारांना आलेल्या ईडीच्या नोटिसीवरुन  अजित पवारांवर टीका होत असल्याबाबत तटकरे म्हणाले, रोहित पवारांना आलेली नोटीस ही त्यांच्या संस्थेच्या अनुषंगाने असून, त्याचा अनेक महिने तपास सुरू आहे. ‘ईडी’च्या नोटीसीमागे कोणतीही खेळी नाही पण, अजितदादांना सर्वत्र मोठा पाठिंबा मिळत असल्याने त्यांच्याविरुध्द लावा ताकद, करा बदनाम असा हा प्रकार सुरु आहे. तरीही अजितदादाचं नेतृत्व येत्या निवडणुकात पूर्णपणे सिध्द होईल असा ठाम विश्वास खासदार तटकरेंनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision on maratha reservation possible by end of february says sunil tatkare zws