सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील महाकाय उजनी धरणातील साचलेला गाळ काढण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी घेतला होता. त्या अनुषंगाने निविदाही मागिवण्यात आल्या होत्या. परंतु नंतर काही तांत्रिक कारणामुळे हे काम रद्द करण्यात आले होते. यासंदर्भात तज्ज्ञांच्या समितीने शासनाला अहवाल सादर केला असून, तो अहवाल पाहून त्याविषयी पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
सोलापुरात उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी धरणातील पाणी वाटपाच्या नियोजनावर निर्णय घेताना धरणात साचलेल्या गाळाचा विषयही चर्चेत आला.
हेही वाचा – जालन्यात निबंधक सहकारी विभागात ३० लाख लाच मागणीचे प्रकरण उघडकीस
तत्कालीन मुख्यमंत्री फडवणीस यांच्या सरकारने उजनी धरणासह गिरणा (नाशिक), गोसीखुर्द (भंडारा), जायकवाडी (छत्रपती संभाजी नगर) आणि मुळा (अहिल्यानगर) या पाच धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने मेरी संस्थेच्या अहवालानुसार गाळ काढण्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या होत्या. परंतु, पुढे त्याबाबत फारशी हालचाल झाली नाही. दरम्यान, काही तांत्रिक कारणामुळे धरणातील गाळ काढण्याचा निर्णय शासनाला मागे घ्यावा लागला.
हेही वाचा – अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री विखे-पाटील यांच्यासमोर उजनी धरणातील गाळ काढण्याचा मुद्दा चर्चेत आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, उजनी धरणातून दहा ते पंधरा टीएमसी गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. परंतु, ती प्रक्रिया काही कारणामुळे रद्द झाली आहे. त्या अनुषंगाने तज्ज्ञांच्या समितीने अहवाल शासनाला सादर केला आहे. तो अहवाल पाहून त्याविषयी पुढील काळात निर्णय घेऊ, अशी माहिती त्यांनी दिली.