विश्वास पवार, लोकसत्ता
वाई : साताऱ्यातील नऊ साखर कारखान्यांनी तब्बल ११ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. इथेनॉलचे पैसे एक आठवडा ते ३५ दिवसांत मिळत असल्याने साखर कारखान्यांना एफआरपी देणे सोपे झाले. मात्र याच वेळी साखर हंगामात विविध बँकांकडून घेतल्या जाणाऱ्या साखर कारखान्यांच्या कर्जामध्ये घट झाल्याचेही दिसून येत आहे. सर्व साखर कारखान्यांनी एक हजार कोटी रुपयांचे कर्जच न घेतल्याचा मोठा फटका साताऱ्यातील बँकांना बसला आहे.
या वर्षीच्या गाळप हंगामात साताऱ्यातील १४ साखर कारखान्यांनी गाळप केले. कारखाने सुरू होण्यापूर्वी गाळप हंगामाच्या तयारीसाठी जिल्ह्यातील विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. यापूर्वीच्या साखर साठय़ावर बँकांकडून ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात होते. त्यामुळे साखर कारखान्यांना एफआरपी आणि अन्य देणी देणे सुलभ जात होते. जसजशी साखर विक्री होईल तसे कारखाने कर्ज फेडत असत. गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी मागील एफआरपी देणे, यंत्रसामग्री दुरुस्ती करणे, कामगारांचे वेळेत पगार करणे, ऊस तोडणी आणि वाहतुकीचे पैसे देणे, व्यापाऱ्यांची देणी देणे, यासाठी कारखान्यांना पैसे लागतात. साखर आणि इतर उत्पादनांची विक्री झाल्यानंतर लवकर पैसे मिळत नसल्याने कर्ज घेणे भाग पडत होते. परंतु केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिल्यानंतर आता साखर कारखान्यांचे आर्थिक गणित बदलले आहे. इथेनॉल उत्पादन करण्यापूर्वीच थेट पेट्रोलियम कंपन्याशीच करार केले जात आहेत. याचे पैसे एक आठवडा ते ३५ दिवसांत मिळतात. त्यामुळे कारखान्यांना एफआरपी देणे सोपे झाले. परिणामी, साखर कारखान्यांच्या कर्जउचलीत मोठी घट झाली आहे. हा बँकांसाठी फार मोठा चिंतेचा विषय आहे. तर कारखान्यांचे शेकडो कोटी रुपये व्याज वाचले. त्याचा हा मोठा फायदा कारखान्यांना झाला. साखर कारखान्यांनी कर्ज कमी घेतल्याचा थेट फटका बँकांना बसला असून कारखान्याच्या कर्ज उचलीचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बँक व्यवस्थापन आता अन्य पर्यायांच्या शोधात आहे. साखर कारखान्यांनी कर्ज न घेतल्याचा सर्वाधिक फटका सातारा जिल्हा बँकेला बसला आहे साताऱ्यातील साखर कारखाने बँकेकडून मोठय़ा प्रमाणात कर्ज घेत होते. जिल्हा बँकेकडे पुढील हंगामात इथेनॉल प्रकल्प आणि कारखाना विस्तार वाढीचे काही कारखान्यांनी प्रस्ताव सादर केले आहे. यामध्ये संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर त्यांना कर्जपुरवठा केला जाईल. बँकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार नाही. परंतु ज्या कारखान्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतले आहे त्या बँकांना फटका बसणार आहे. कर्ज उचल कमी झाल्याने व व्याज वाचल्याने कारखान्यांना पुन्हा एकदा अर्थबळ प्राप्त होण्याची शक्यता आहे
बँका चिंतेत..
साताऱ्यातील साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १७०० कोटींचे कर्ज उचलले होते. मात्र यंदाच्या हंगामात या कर्जात यंदा ७० कोटींची घट झाली आहे. त्याचबरोबर अन्य सरकारी आणि खासगी बँकांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जाची रक्कम सुमारे ३०० कोटींनी घटली आहे.
इथेनॉल उत्पादनामुळे साखर कारखान्याच्या कर्जात मोठी घट झाली आहे. या वर्षीच्या हंगामात सातारा जिल्हा बँकेकडून सातशे कोटींचे कर्ज घेतले आहे. गेल्या वर्षी एक हजार सातशे कोटी उचलले होते. हा अनुशेष भरून काढण्यासाठी बँकेकडून अन्य पर्यायांचा शोध घेतला जात आहे.
– डॉ राजेंद्र सरकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा बँक.