देशभरात काँग्रेसच्या पराभवानंतर उपाध्यक्ष राहुल गांधी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करीत आहेत. मग, राज्यातील पराभवाची चर्चा करायला हवी. त्याची कारणमीमांसा व्हायला हवी. ज्या जागा थोडय़ाशा मताने पडल्या आहेत, तेथे बरेच काही घडले आहे. जिल्हानिहाय त्यांच्या बैठका घ्यायला हव्यात आणि ‘साफसफाई करायला हवी’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासमोर सोमवारी केली. हीच मागणी उद्या (मंगळवारी) राज्यस्तरीय बैठकीतही महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासमोर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसची पराभवानंतरची मीमांसा करण्यासाठी विशेष बैठक मुंबईत उद्या होणार आहे.
मराठवाडय़ातील दुष्काळी स्थिती जाणून घेण्यासाठी तालुकाध्यक्ष, निरीक्षकांची विभागीय बैठक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. खासदार अशोक चव्हाण यांची या वेळी उपस्थिती होती. दुष्काळाच्या अनुषंगाने फडणवीस सरकारवर ठाकरे यांनी टीका केली. त्यानंतर पत्रकार बैठकीत ‘दुष्काळ काही अचानक आला नाही. त्या काळात आघाडी सरकारने कोणते निर्णय घेतले होते’, असा प्रश्न विचारला आणि ठाकरे निरुत्तर झाले.
मराठवाडय़ात आयआयएम ही संस्था यायला हवी, अशी शिफारस मुख्यमंत्री फडणवीस यांनी करण्याची गरज होती. मात्र, त्यांनी तसे केले नाही. यावरूनही टीका करण्यात आली होती. मात्र, आघाडी सरकारच्या शेवटच्या अडीच महिन्यांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठवाडय़ाच्या बाजूने विचार का केला नाही, असाही प्रश्न विचारला गेला आणि पत्रकार बैठकीत उपस्थित असणाऱ्या अशोकरावांना सारवासारव करावी लागली. या प्रश्नाचे उत्तर अशोकरावच देतील, असे म्हणत माणिकरावांनी अंग काढून घेतले. ‘शिफारस जरी राज्य सरकारने केली असली तरी निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा आहे. त्यांनी तो मराठवाडय़ाच्या अंगाने घ्यावा, अशी आमची मागणी असेल’, असे सांगत खासदार चव्हाण यांनी विषय टोलवून नेला.
पत्रकार बैठकीपूर्वीच्या मेळाव्यात ‘साफसफाई’च्या विषयाला सुरेश जेथलिया यांनी सुरुवात केली. ते म्हणाले की, आमच्यासारखे अनेकजण अनेक कमी फरकाने पराभूत झाले. याची पक्षाच्या पातळीवर चर्चा व्हायला हवी. कोण कसे वागले, हे एकदा सांगू द्या.’ हा धागा खासदार चव्हाण यांनी लावून धरला. ते म्हणाले की, साफसफाईची मोहीम हाती घ्यायला हवी. काही निर्णय घ्यायलाच हवे. कोणाला कितीही वाईट वाटले तरी कोण चांगले आणि कोण वाईट हे ठरवावे लागेल. चांगले काम करणाऱ्याला पुढे आणावे लागेल. त्यामुळे पक्षपातळीवर काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. ते घेण्याबाबतची विनंती मोहन प्रकाश यांच्याकडे करू.’
यावर बोलताना माणिकराव ठाकरे यांनी गेव्ह आवारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून त्यांच्याकडील प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे भाषणात सांगितले. या अनुषंगाने पत्रकार बैठकीत बोलताना केल्या जाणाऱ्या कारवाईची संख्या अधिक असेल, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा