सातारा : मायणी वैद्यकीय महाविद्यालय फसवणुकीच्या गुन्ह्यात दीपक देशमुख यांना अंमलबजावणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने गुरुवारी अटक केली. साताऱ्यात पोलीस मुख्यालय परिसरात ही कारवाई केली. मायणी वैद्यकीय महाविद्यालय अपहारप्रकरणी देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यातून सातारा आर्थिक गुन्हे शाखा येथे गुन्ह्याचा तपास वर्ग करण्यात आला आहे. काही गुन्हे ईडीकडे वर्ग झाले आहेत.
दीपक देशमुख यांच्याविरुद्ध मायणी वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचारप्रकरणी २०२३ साली फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास सातारा आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले करत आहेत. देशमुख यांना या गुन्ह्यात सातारा आर्थिक गुन्हे शाखेत तपासासाठी हजर राहण्यासह अटी आणि शर्तीवर उच्च न्यायालयात जामीन मिळाला आहे. दरम्यान यातीलच काही गुन्ह्यांचा तपास ‘ईडी’तर्फेही सुरू आहे. यातील सातारा पोलिसांकडे सुरू असलेल्या चौकशीसाठी देशमुख सातारा पोलीस मुख्यालय परिसरात आले असता ‘ईडी’ने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. या वेळी सुमारे दीड तास तेथे त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.मागील महिन्यात ‘ईडी’च्या पथकाने देशमुख यांच्या मायणी येथील घरी छापा टाकला होता.
हेही वाचा >>>अहमदनगरची अक्षता जाधव अबॅकस परीक्षेमध्ये राज्यात दुसरी
भ्रष्टाचाराचे प्रकरण काय
दीपक देशमुख यांच्या विरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात २०२३ साली एका संस्थेची जागा दुसऱ्या संस्थेला बक्षीसपत्राने देत बोगस दस्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. यामध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार असल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपवण्यात आले आहे. तसेच यातील काही गुन्ह्यांचा तपास ‘ईडी’कडून स्वतंत्ररीत्या सुरू आहे.