शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर रविवारी ( २६ नोव्हेंबर ) बीड दौऱ्यावर होते. यावेळी एक भावी महिला शिक्षकाने शिक्षक भरतीवरून दीपक केसरकरांना प्रश्न विचारला. त्यावर दीपक केसरकर चांगलेच संतापले. “शिक्षक भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे, तर तुम्ही मला विचारायला कसं आलात?” असा सवाल दीपक केसरकरांनी महिलेला उपस्थित केला.
नेमकं प्रकरण काय?
बीडमधील एका कार्यक्रमानंतर दीपक केसरकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. तेव्हा भावी महिला शिक्षिकाने दीपक केसरकरांना शिक्षक भरतीवरून घेरलं. “शिक्षक भरतीची वाट पाहून आम्ही खूप थकलो आहे. संकेतस्थळ सुरू आहे, नोंदणी सुरू आहे, पण पुढे प्रक्रिया होतच नाही. जाहीरातच आली नाही, तर चॉइस कसा देणार? जाहीरात कधीपर्यंत येणार? आम्ही पाच वर्षापासून जाहीरातीची वाट पाहतोय,” अशा प्रश्नांची सरबत्ती महिलेने दीपक केसरकरांना केली. यानंतर केसरकरांनी महिलेला चांगलंच ठणकावलं.
“तुम्ही कसं मुलांना शिकवणार?”
दीपक केसरकार म्हणाले, “तुम्हाला अजिबात कळत नाही. तुम्ही शिक्षक होऊ शकता का? तुमचं संकेतस्थळ सुरू झालं आहे. मी प्रत्येक जिल्ह्याला जाहीरात देण्यास सांगितलं आहे. ही बेशिस्त असेल, तर सरकारी नोकरीवर येऊ शकत नाही. तुम्ही कसं मुलांना शिकवणार? नोंदणी सुरू झाली आहे, तर तुम्हाला काही वाटत नाही का? तुम्ही मला विचारायला कसं आलात?”
“मी जेवढा प्रेमळ, तेवढा कडकही आहे”
“संकेतस्थळ चालू आहे. भरती सुरू झाली आहे, तर श्रद्धा आणि सबुरी ठेवा. आजपर्यंत पाच वर्षात कुणी शिक्षक भरती केली का? मी केली आहे. मी माध्यमांशी संवाद साधतोय, त्यात तुम्ही येता. मी जेवढा प्रेमळ, तेवढा कडकही आहे. माझ्या दृष्टीने विद्यार्थी महत्वाचे आहेत. मी तीस हजार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. उद्या तुम्ही मुलांनाही ही बेशिस्त शिकवत असाल, तर मला मान्य नाही. कारण, मला शिस्तीने शिकवणारे शिक्षकच हवे आहेत,” असं दीपक केसरकरांनी म्हटलं.
“…तर महाराष्ट्र घडणार आहे”
“माझे अधिकार म्हणजे सर्वस्व, विद्यार्थी म्हणजे काहीच नाही, हे मला चालणार नाही. राज्यातील विद्यार्थी हे महाराष्ट्राचं भवितव्य आहे. ती मुलं चांगली शिकली, तर महाराष्ट्र घडणार आहे. अजिबात मध्ये बोलायचं नाही, अन्यथा तुमचं नाव घेऊन अपात्र करायला लावेन,” अशी तंबीही दीपक केसरकरांनी महिलेला दिली.