राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षक भरती करणार असल्याची घोषणा केली. लवकरच राज्यात ७५ हजारांहून अधिक शिक्षकांच्या पदांची भरती करू, अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली. तसेच केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्षात बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचं काम करणार असल्याचं नमूद केलं. यावेळी दीपक केसरकर शनिवारी (२४ सप्टेंबर) सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
दीपक केसरकर म्हणाले, “शिक्षक भरती करताना राज्यात किती पदं रिक्त आहेत हेही बघावं लागतं. शिक्षक म्हणजे केवळ शिक्षक असत नाहीत, तर त्यांना गणित, विज्ञान असे विषय असतात. ही गुंतागुंतीची प्रक्रिया असते. आम्ही ज्या शाळांना अनुदान देतो तेथेही अनेक शिक्षक अतिरिक्त झालेले असतात. त्या सर्वांचं समायोजन करून लवकरच भरती केली जाणार आहे.”
“ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती असणार”
“ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाचवेळी ७५ हजारांहून अधिक पदांची भरती करण्याची घोषणा केली आहे. केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष ही पदं भरायची आहे यावर कॅबिनेट बैठकीतही चर्चा झाली आहे,”अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली.
हेही वाचा : मुस्लीम सर्वेक्षणाच्या जीआरनंतर अफवांचं पेव, शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, “काही आक्षेपार्ह…”
“अतिरिक्त कर्मचाऱ्यांना सामावून घेणार”
“बेरोजगारांना संधी मिळाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि त्यांचे कॅबिनेटमधील सर्व मंत्री अत्यंत दक्ष आहेत. अतिरिक्त कर्मचाऱ्यांना सामावून घेतलं जाईल. खूप दिवसांनी ही भरती होत आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी हा आशेचा किरण आहे,” असंही केसरकरांनी नमूद केलं.