पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रात एकत्र येत सत्ता स्थापन करणार होते. पण, ही बातमी संजय राऊतांनी फोडली आणि शरद पवारांना सांगितली. त्यामुळे जनतेनं ज्या युतीला मतदान केलं होतं, ती होऊ शकली नाही. पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते, तर चांगलं चित्र निर्माण झालं असतं. तसेच, शिवसेनेची फूटही टळली असती, असं मत मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

दीपक केसरकर म्हणाले, “उद्धव ठाकरेंचं मत हिंदुत्वाबरोबर जाण्याचं होतं. मात्र, उद्धव ठाकरेंची दिशाभूल करण्याचं काम संजय राऊतांनी केलं आहे. पंतप्रधान मोदींना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेला आदर मी स्वत: पाहिलेला आहे.”

हेही वाचा : “आईची जात मुलांना लागू केल्यास मोठा घोळ होईल”, बच्चू कडूंच्या विधानावर जरांगे-पाटील म्हणाले…

“कलम ३७० पंतप्रधानांनी हटवलं”

“राम मंदिरासाठी सर्वात जास्त योगदान बाळासाहेब ठाकरे यांचं आहे. ‘मला एक दिवस पंतप्रधान करा मी राम मंदिर बांधून दाखवेन आणि कलम ३७० हटवून दाखवेन,’ असं बाळासाहेब ठाकरे यांचं मत होतं. या दोन्ही गोष्टी पंतप्रधान मोदींनी पूर्ण केल्या आहेत,” असं दीपक केसरकरांनी म्हटलं.

हेही वाचा : “ठाकरे गट लोकसभेच्या २३ जागा लढवणार”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार म्हणाले, “हायकमांड…”

“क्युरेटिव्ह याचिका ऐकण्याचं न्यायालयानं मान्य केलं”

“मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार बांधील आहे. क्युरेटिव्ह याचिका ऐकण्याचं न्यायालयानं मान्य केलं आहे. यासाठीच्या पूर्वतयारीला सरकारकडून सुरूवात झाली आहे. तसेच, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे,” असं दीपक केसकरांनी सांगितलं.