आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आतापासूनच कामाला लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे ९ आणि १० जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. आदित्य ठाकरे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघात सभा घेणार आहेत. यावरून शिंदे गटातील मंत्री दीपक केसकर यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
दीपक केसरकर म्हणाले, “आदित्य ठाकरेंना सगळीकडे दौरे करू द्या. खरेतर भाजपा-सेना युती तुटण्यामागे आदित्य ठाकरेंचा मोठा वाटा होता, हे जनतेला कळत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून आदित्य ठाकरे दूर गेले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे काँग्रेसचे काय विचार मांडतात, ते ऐकायला मिळेल.”
जागा वाटपावरही केसरकरांनी भाष्य केलं आहे. “जागा वाटपाबाबत वरिष्ठ निर्णय घेतात. पण, जिथे आमचे खासदार आहेत, तिथे त्या पक्षाचं जागा लढवायच्या हे सूत्र असतं. त्याचं पालन होईल. तसेच, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. त्यामुळे तिथे शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे,” असं म्हणत दीपक केसकरांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना सद्यस्थितीला पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान, शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर शिवसेना ठाकरे गटाचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक हे ठाकरेंची साथ सोडत शिंदेंबरोबर गेले होते. विद्यमान दोन्ही खासदार शिवसेनेचे असल्याने या दोन्ही जागांवर ठाकरे गटाने आपला दावा सांगितला आहे. पण, महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटप निश्चित करण्यात येणार आहे. यामुळे या जागावाटप बैठकीत ही जागा कोणाला जाणार याकडे तर सर्वांची उत्सुकता लागून राहिलीच आहे.
मात्र, ठाकरे गटाकडून या दोन्ही मतदारसंघ मजबूत करण्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. या दोन्ही सभांमध्ये आदित्य ठाकरे यांची तोफ शिंदे गटाबरोबर गेलेल्या दोन्ही खासदारांवर धडाडणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.