विरोधकांची इंडिया नावाची आघाडी तयार झाली आहे. यामध्ये चर्चा सुरु आहे की, उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान बनवायचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपलं लक्ष त्याकडे दिलं पाहिजे. मतदारसंघाची निवड करत लोकसभा निवडणुकीची तयारी करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपण टीकू शकतो का? याचा उद्धव ठाकरे यांनी विचार करावा, असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला आहे. ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
“आम्ही युती म्हणून भाजपाबरोबर गेलो आहोत. कोणालाही फसवलं नाही. युतीत निवडणूक लढवायची आणि स्वत:च्या मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड करायची, असे आम्ही काहीही केलं नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड केल्याने आमदार, खासदार सोडून गेले, पक्ष आणि चिन्ह मिळालं नाही,” अशी टीकाही दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
हेही वाचा : VIDEO : “काहींना वाटतं मी म्हणजे ठाणे आहे, पण…”, उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
‘आपल्याला गद्दारांना गाडायचं आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. याबद्दल विचारल्यावर दीपक केसरकर यांनी सांगितलं की, “गद्दार कोणाला म्हणायचे याची व्याख्या ठरली पाहिजे. आम्ही कधी उद्धव ठाकरेंना गद्दार म्हणणार नाही, कारण त्यांच्याबद्दल आदर आहे.”
हेही वाचा : VIDEO : “काहींना लवकरच ठाणे सोडून पळून जावे लागणार आहे”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
“एक विशिष्ट विचारधारा घेऊन जनतसमोर गेल्यावर ते मतदान करतात. त्याच विचारधारेबरोबर राहावे लागते. नाहीतर आपण राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवावी लागते. त्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबर असलेल्या आमदारांनी राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जावे,” असे आव्हानही दीपक केसरकर यांनी दिलं आहे.