एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युती होऊ शकते अशी चर्चा रंगली आहे. यादरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठा खुलासा केला आहे. मानपानात दोन्ही पक्षांची युती अडकली आहे अशी माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. पहिला फोन कोणी करायचा यावरूनच युती खोळंबली असल्याचं केसरकरांनी सांगितलं आहे.
केसरकरांनी काय सांगितलं आहे –
“मी शिंदेंचा प्रवक्ता आहे, खासदारांचा नाही. ज्या दिवशी खासदार आमच्यावतीने तुम्ही बोला असं सांगतील, तेव्हा मी बोलेन. पण माझ्या माहितीनुसार हे गाडं मानपानावरुन अडलं आहे. आधी फोन कोणी करावा यावरुन मातोश्री आणि भाजपा श्रेष्ठी यांच्यात बोलणी अडली आहे,” असा खुलासा दीपक केसरकरांनी केला आहे.
“दीपक केसरकर उडते पक्षी,” आदित्य ठाकरेंवरील टीकेमुळे किशोरी पेडणेकर संतापल्या
“गुवाहाटीवरुन मी एकनाथ शिंदे आणि ५० आमदारांच्या वतीने आज शेवटचा दिवस असल्याचं जाहीर केलं होतं. तुम्ही महाविकास आघाडी तोडा, आम्ही ५० आमदार महाराष्ट्रात येऊ असं सांगितलं होतं. पण आघाडी तोडली का? पण आज ती अनायसे तुटली आहे. तेव्हा तरी निर्णय घ्या,” असं आवाहन केसरकरांनी केलं आहे.
“उद्या आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेऊ तेव्हा तो एकट्याचा निर्णय नसेल, तो सामूहिक निर्णय असेल, त्यावेळी तुम्हाला भाजपचा विचार करावा लागेल, असंही आम्ही सांगितलं होतं,” याची आठवण दीपक केसरकर यांनी करुन दिली.
यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आता शिवसेना-भाजपा युती आहेच. एकनाथ शिंदे शिवसेनेच नेते असून त्यांच्यासोबत असलेले आमदार आपण अजूनही शिवसैनिक असल्याचं सांगत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये शिवसेना-भाजपा युती आहेच. आम्ही तर एकनाथ शिंदे यांना रोजच फोन करतो. ते रोजच फडणवीसांच्या संपर्कात असतात. त्यामुळे आमच्याकडून उद्धव ठाकरे यांना फोन जाण्याचा प्रश्नच नाही,” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
राणे यांनी ‘मातोश्री’वर बोलण्याचे टाळावे – दीपक केसरकर
दुसरीकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, कोण फोन करणार याबाबत मी सांगू शकत नाही. मात्र माझ्या पक्षाच्या प्रमुखांचा जो निर्णय असेल तो मान्य असेल असं सांगितलं आहे.