सावंतवाडी : ब्राझीलमध्ये काजू बोंडावर प्रकिया करून विविध प्रकारची पेये बनविली जातात. याबाबत अभ्यास दौऱ्यावर जाऊन करार करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात अंमलबजावणीनंतर काजू बोंडावर प्रकिया उद्याोग सुरू झाल्यावर बागायतदारांची आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल, असा विश्वास सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, कोकण कृषी विद्यापीठ अधिकाऱ्यांना घेऊन सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी नुकताच ब्राझील दौऱ्या केला. त्याबाबत ते बोलत होते. काजू बोंडे आणि दूध उत्पादन याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले.
केसरकर म्हणाले,काजू बोंडसंदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे. लवकरच त्या कंपनीचे एमडी व टीम भारतात येणार आहेत. येथील काजूची ते पाहणी करणार असून त्यानंतर काजू बोंडावर प्रकिया सुरू केल्यावर चांगला दर काजू बागायतदारांना मिळणार आहे. काजू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, कोकणात २ लाख हेक्टर जमिनीवर काजूची लागवड आहे. यातील काजू गरावर प्रक्रिया होते. मात्र, काजू बोंड फुकट जातात. तीन हजार २०० कोटींची काजू बोंड वाया जात आहेत. ब्राझील देशात यावर विशेष संशोधन झालं असून या बोंडापासून विविध प्रकारची पेये, काजूचा जूस, मिट आदींसारखे पदार्थ बनवले जातात. दौऱ्यात यावर अभ्यास केला गेला. तसेच नॉन डिस्क्लोझर करार या दौऱ्यात करण्यात आला आहे. लवकरच या कंपनीचे एमडी व टीम भारतात येणार आहेत. येथील काजूची ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर काजू बोंडावर प्रकिया सुरू केल्यावर चांगला दर काजू बागायतदारांना मिळून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल, असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.
तसेच भारतील गाईंच संवर्धन ब्राझीलमध्ये केलं गेलं आहे. यामध्ये संकरीत जाती देखील करण्यात आल्या आहेत. आपल्याकडील कोकण कपिला गाईंच्या दुग्ध उत्पादन वाढ व्हावी या दृष्टीने देखील यावेळी चर्चा झाली. त्या पद्धतीच तंत्रज्ञान प्राप्त झाल्यानंतर व दुग्ध उत्पादन वाढ झाल्यावर कोकण कपिलाचा एटू मिल्क म्हणून वापर करता येईल असं त्यांनी सांगितलं. कोकण कपिला गाईच्या दुधात वाढ होण्यासाठी नक्कीच ब्राझील कडून मार्गदर्शन मिळेल असे केसरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी शहरात देखील पर्यटन विकास होत आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा म्युझिकल फाऊंटन उभा राहत आहे. महिला, युवक यांच्यासाठी सिंधुरत्न योजनेतून पर्यटन प्रकल्प साकार होत आहेत. हाऊस बोटच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे. तसेच ताज ग्रुपच्या माध्यमातून माय बंगलोसारखा उपक्रम राबविण्यात येणार असून ३५ बंगले महिलांना पर्यटन व्यवसाय करण्यासाठी दिले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महिलांना पर्यटनासाठीच्या मिनी बसेसचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली. तसेच रत्नागिरीमध्ये सिंधुरत्न योजनेतून हाऊस बोट प्रकल्प सुरू झाला आहे असे ते म्हणाले.