मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी (२३ नोव्हेंबर) शिर्डी दौऱ्यावर असताना अचानक पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करून सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मुख्यमंत्र्यांनी असं भविष्य पाहिलं असल्याचं गंभीर असल्याचं म्हणत टीका केली. आता यावर शिर्डी दौऱ्यात एकनाथ शिंदेंबरोबर असलेले मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीपक केसरकर म्हणाले, “कॅप्टन खरात म्हणून माझे एक मित्र आहेत. त्यांचं ईशान्येश्वर हे मंदिर आहे. तेथे गोशाळा व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक देणगी दिली होती. त्यामुळे कॅप्ट खरात यांची इच्छा होती की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकदा ईशान्येश्वर मंदिराला आणि गोशाळेचं काम सुरू होणार आहे त्याला भेट द्यावी.”

“मुख्यमंत्र्यांना भविष्य पाहायचं असतं, तर त्यांनी…”

“आता कॅप्टन खरात यांचा व्यवसाय भविष्य पाहणे असेल, तर भविष्य विचारायला मुख्यमंत्री ईशान्येश्वर मंदिरात का जातील? भविष्य पाहायचं असतं तर त्यांनी कॅप्टन खरात यांना मुंबईत बोलावून घेतलं असतं आणि भविष्य पाहिलं असतं. त्यामुळे काहीही बातम्या देणं हे चुकीचं आहे,” असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं.

“मुख्यमंत्र्यांनी गोशाळेसाठी १० मित्रांना फोन केला”

“माझी सर्वांना विनंती आहे की, शेवटी प्रत्येकाला व्यक्तिगत आयुष्य असतं. त्यात ते शिवभक्त असतील आणि त्यांनी आपल्या १० मित्रांना फोन करून देणगी द्या म्हणत खरोखर गोशाळेसाठी काही केलं असेल तर ते गोशाळेसाठी आहे,” असंही दीपक केसरकर यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “संजय राऊत बोकडाची औलाद”, आमदार संजय गायकवाडांच्या टीकेला राऊतांचं एका वाक्यात प्रत्युत्तर, म्हणाले…

मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

अजित पवार म्हणाले, “आपण का अंधश्रद्धेला खतपाणी घालतो मला समजत नाही. प्रत्येकाची कुठे ना कुठे निष्ठा असते, विश्वास असतो त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या बातम्या आल्या आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे माहिती नाही. त्यामुळे वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केली पाहिजे.”

“शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होतं तेव्हा आम्ही…”

“एक गोष्ट खरी आहे की, आम्ही राजकीय लोक कुठेही गेलो तर तेथील स्थानिक देवस्थानांना भेट देतो. शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होतं तेव्हा आम्ही सकाळी सकाळी लवकर जाऊन शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलं. पंढरपूर परिसरात जातो तेव्हा आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतो. जेजुरी परिसरात जातो तेव्हा खंडेरायाचं दर्शन घेतो. तुळजापूर परिसरात तुळजाभवानीचं दर्शन घेतो. कोल्हापुरात गेल्यावर अंबाबाईचं दर्शन घेतो,” असं अजित पवारांनी नमूद केलं.

“ज्योतिषाकडे जाऊन आपलं भविष्य बघणं म्हणजे…”

अजित पवार पुढे म्हणाले, “ही आपली परंपरा आहे. त्याबद्दल आपल्या मनात आदराचं, श्रद्धेचं स्थान आहे. तिथंपर्यंत मी समजू शकतो. मात्र, ज्योतिषाकडे जाऊन आपलं भविष्य बघणं म्हणजे २१ व्या शतकात सर्व जग चाललं असताना आपण अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखं आहे.”

हेही वाचा : कर्नाटक सरकारच्या दडपशाहीसमोर महाराष्ट्र सरकार कमी पडतंय का? मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“आमच्यासारखे तर हतबलच झालेत”

“तंत्रज्ञानाच्या युगात अनेक बदल होत आहेत. अशावेळी विज्ञान काय सांगतंय हे न पाहता पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. यावर काय बोलावं, आमच्यासारखे तर हतबलच झालेत,” असं म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंचे कान टोचले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak kesarkar comment on cm eknath shinde and astrology pbs