संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिराच्या भक्त निवासाला जिल्हा नियोजनातून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल. हे मंदिर तीर्थक्षेत्र बनवायला हवे, त्यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य राहील, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. इन्सुली डोबाशेळ येथे श्री संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार दिन आज होता, त्या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. या वेळी शिवाजीराव पालव, अरविंद पेडणेकर, आर. एन. पालव, तानाजी पालव, गुरुनाथ पेडणेकर, अशोक दळवी, रणजीत सावंत, संजय तावडे व नाथांचे भक्त उपस्थित होते. संत सोहिरोबानाथांचे आत्मसाक्षात्कार मंदिर तीर्थक्षेत्र बनावे म्हणून सर्वतोपरी सहकार्य देण्याची तयारी आहे असे सांगत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संत विचारांचे प्रत्येकाने चिंतन करून हा भाग सुजलाम्-सुफलाम् बनवावा असे आवाहन केले. ते म्हणाले, तिलारी प्रकल्पाचा कालवा आणि पिण्याच्या पाण्याची लाइन इन्सुलीतून जाणार आहे, त्याचा फायदादेखील या गावाला मिळणार असल्याचे पालकमंत्री केसरकर म्हणाले.
यापूर्वी सोहिरा भक्तनिवासाचे उद्घाटन अ‍ॅड. रामनाथ अंबिये व ‘म्हणे सोहिरा प्रकाशन’ शिवाजीराव पालव यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना अ‍ॅड. अंबिये यांनी पर्यटनक्षेत्र नव्हे तर तीर्थक्षेत्र बनावे. त्याचा फायदा सर्वाना मिळावा म्हणून यापुढे प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.
या वेळी बोलताना सद्गुरू वामनराव पै यांचे शिष्य शिवाजीराव पालव म्हणाले, या ठिकाणी सोहिरोबानाथांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा पुढील काळात प्रयत्न राहील. विज्ञान दृष्टिकोनातून कर्मकांड नव्हे तर साधना देण्याचा विचार असून लहान मुले, विद्यार्थी यांच्यावर संस्कार घडावेत म्हणून विचारदेखील दिले जातील. आर. एन. पालव यांनी पालखी व सोहिरोबानाथांच्या पादुका दिल्या त्याची मिरवणूकदेखील काढली गेली. हा मोठा आध्यात्मिक विचार आहे. सर्वानाच कल्याणकारी मार्ग मिळावा म्हणून काम करण्यात येईल असे ते म्हणाले.
या वेळी आर. एन. पालव म्हणाले, आम्ही संतांच्या भूमित जन्मलो, त्यांचे विचार घेऊन आम्ही मोठय़ा शहरात काम करत असलो तरी साक्षात्कार दिनी येथे येतो. कै. नंदू पेडणेकर यांनी भक्तनिवास संकल्प सोडला होता. हा प्रत्यक्षात पूर्ण झाला. यापुढील काळात संत सोहिरोबानाथ मंदिर तीर्थक्षेत्र कसे बनेल त्यासाठी आम्ही सारे एकजुटीने प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
या वेळी अरविंद पेडणेकर म्हणाले, आम्ही अधात्म्य आचारविचारातून साकारतो आहोत. पुढील काळात इन्सुली नाथांच्या भक्तांच्या कल्याणासाठी सर्वानी मिळून काम करण्याची तयारी ठेवल्याचे स्पष्ट केले.
जिल्हा परिषद सदस्य गुरुनाथ पेडणेकर यांनीदेखील भक्तनिवासाची माहिती दिली. त्यांच्याच पुढाकारातून भक्तनिवास साकारले आहे. उमेश पेडणेकर यांनी आभार तर गीतांजली पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी संजय तावडे, रघुवीर नाटेकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.