पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी आणि याचबरोबर पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात भरघोस निधीची तरतूद केली आहे. कोकण ग्राम पर्यटनाच्या माध्यमातून बांदा ते चांदा या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्य़ात पर्यटनांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जिल्ह्य़ात कणकवली, मालवण, सावंतवाडी आदी ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या पर्यटन महोत्सवाद्वारे सांस्कृतिक देवाणघेवाणीबरोबरच पर्यटनासही निश्चित चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कणकवली येथे व्यक्त केली. कणकवली नगर पंचायतीमार्फत आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, कोकण पाटबंधारे मंडळाचे माजी अध्यक्ष संदेश पारकर, सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे, अतुल रावराणे, अवधूत मालवणकर, मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, पी. डी. कामत आदी मान्यवर उपस्थित होते. पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन समारंभापूर्वी कणकवली शहरातून पटकी देवी मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत महिलांचे ढोलपथक, कणकवलीतील विविध मंडळांचे चित्ररथ, धनगर बांधवांचे गजनृत्य, उंट-घोडे यांचा ताफा, दुर्गामाता व श्रीविष्णूची भव्य प्रतिकृती, भजनी मंडळ, देवतरंगाची मिरवणूक, सांस्कृतिक देखावे, कोंबडा, पांडा, मोर यांच्या प्रतिकृती यामुळे शोभायात्रा शानदार झाली. पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनानंतर नयनमनोहारी फटाक्यांच्या आतषबाजीने रसिक मंत्रमुग्ध झाले. प्रारंभी कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा माधुरी गायकवाड व उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या समारंभास कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक, नगरसेविका तसेच नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पर्यटनवृद्धीसाठी निधीची तरतूद – पालकमंत्री
पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी आणि याचबरोबर पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात भरघोस निधीची तरतूद केली आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 08-05-2016 at 01:29 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak kesarkar comment on konkan tourism