उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार यांनी आज (२१ फेब्रुवारी) खासदार शरद पवार गटाच्या बारामतीमधील राष्ट्रवादी कार्यालयाला अचानक भेट दिली. या भेटीनंतर बारामती तसेच महाराष्ट्रात वेगवेगळ्या तर्कांना उधाण आले आहे. एकीकडे ‘माझा परिवार वगळता इतर सर्वजण माझ्याविरोधात प्रचार करतील. मात्र तुम्ही महायुतीच्या उमेदवाराला मत द्या,’ असे आवाहन करताना अजित पवार दिसत आहेत. असे असतानाच युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या कार्यालयाला भेट दिल्यामुळे आता अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या रुपात काका-पुतण्यात राजकीय लढाई रंगणार का? असा प्रश्न विचारला जातोय. यावरच शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते आज मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
“…तर मग अजित पवार यांची बदनामी का व्हावी”
“अजित पवार यांनी काका-पुतण्यांची लढाई कधीही केलेली नाही. पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवार यांची एवढी बदनामी झाली. मात्र ही बदनामी त्यांनी स्वत:वर घेतली. शेवटच्या क्षणी त्यांनी सांगितलं की मला शरद पवार यांनीच शपथ घ्यायला सांगितले होते. शरद पवार यांनीदेखील ते नाकारलेले नाही,” असे दीपक केसरकर म्हणाले. तसेच शरद पवार यांनीच शपथ घ्यायला सांगितली असेल तर मग अजित पवार यांची बदनामी का व्हावी, असा सवालही त्यांनी केला.
बाहेरच्या लोकांनी यात न पडणं योग्य ठरेल
“पवार कुटुंबामध्ये अजित पवार त्यांच्या काकांचा मान ठेवतात. आम्ही तो सर्वांनीच पाहिलेला आहे. शरद पवार यांना तो मान महाराष्ट्रातील प्रत्येकजणच देतो. मला वाटतं की आम्ही बाहेरच्या लोकांनी यात न पडणं योग्य ठरेल,” असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
“…तर त्यात गैर काय आहे”
“अजित पवार हे महाराष्ट्रात चांगलं काम करत आहेत. त्यांच्या कामाचे मूल्यमापन ही महाराष्ट्रातील जनता करेल. अजित पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांना त्यांच्या आजोबांबद्दल प्रेम असेल. याच कारणामुळे युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या कार्यालयात गेले असतील. त्यात गैर काय आहे. हे घरगुती संबंध असतात. शरद पवार यांना वाईट वाटू नये म्हणून युगेंद्र त्या कार्यालयात गेले. ही चांगलीच बाब आहे,” असे भाष्य केसरकर यांनी केले.