Deepak Kesarkar : इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामधल्या कवितेवर सध्या सोशल मीडियावर प्रचंड टीका होते आहे. ‘जंगलात ठरली मैफल’ असं या कवितेचं नाव आहे. या कवितेत इंग्रजी शब्दाचा वापर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या कवितेचे स्क्रिन शॉट व्हायरल होत आहेत आणि हे महाराष्ट्र शासनाचे बालभारतीचं पुस्तक कवितेच्या ओळीत ‘वन्स मोअर, वन्स मोअर झाला शोर’ हे शब्द आहेत. मराठी भाषा शिकवताना त्यातल्या कवितांमध्ये इंग्रजी शब्दाचा वापर कशासाठी? असा जाब नेटकरी विचारत आहेत. मराठी शाळा टिकवल्या पाहिजेत या फेसबुक ग्रुपचे सदस्य संदीप जोशी यांनी कवितेचं छायाचित्र पोस्ट केलं जे व्हायरल झालं. ज्यानंतर आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar ) यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमका हा वाद काय ?

‘जंगलात ठरली मैफल’ असं बालभारतीच्या पुस्तकातील कवितेचं नाव आहे. या कवितेमध्ये फक्त यमक जुळवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्याचप्रमाणे मराठीच्या पुस्तकातील या कवितेत हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा देखील वापर केला गेलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारची भाषा शिकवण्यावर सध्या आक्षेप घेतला जातोय. ही कविता सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आणि विविध नेटकऱ्यांनी, मान्यवरांनी यावर प्रश्न उपस्थित केल्याने या कवितेबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी वन्स मोअरला पर्यायी शब्द मराठी भाषेत नाही असं म्हटलं आहे. तसंच या कवितेत समजा काही शब्द असतील तर त्याचा बाऊ करु नये असंही त्यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- पहिलीच्या मराठी कवितेत इंग्रजीचा वापर! बालभारतीवर का होतेय टीका? तज्ज्ञांचं म्हणणं काय?

दीपक केसरकर यांनी काय म्हटलं आहे? (What Deepak Kesarkar Said? )

“वन्समोअरला अल्टरनेट मराठी शब्द आहे का? शेवटी यमक जुळवत असताना एखादा इंग्रजी शब्द आला तर त्याचा फार मोठा बाऊ केला पाहिजे असं मुळीच नाही. कारण आपण टेबल म्हणतो तो मराठी शब्द आहे का? कप म्हणतो तो पण इंग्रजी शब्द आहे. या शब्दांना पर्यायी मराठी शब्द आलेले नाहीत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण प्रॅक्टीकल राहिलं पाहिजे. आम्ही मराठी भाषेचं धोरण ठरवलं. १८ वर्षे धोरण आलं नव्हतं त्यावेळी कुणालाही मराठीचा कळवळा आला नाही. मराठी भाषेचं धोरण आम्ही आणलं, प्रत्येक शासकीय कार्यालयात मराठी बोलणं सक्तीचं केलं आहे. तोपर्यंत त्या व्यक्तीचं काम होत नाही. ही भूमिका सरकारने घेतली आहे, त्यामुळे मराठीचा अभिमानच आहे.” असं दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी म्हटलं आहे.

पहिल्याच्या पाठ्यपुस्तकात असलेल्या याच कवितेवरुन सोशल मीडियावर टीका होताना दिसते आहे. या कवितेत इंग्रजी आणि हिंदी भाषेतील शब्द वापरले आहेत.

वन्सन मोअर हा रुढ झालेला शब्द आहे, मुलांना तोच समजतो-केसरकर

पुढे दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) म्हणाले, “एखाद्या कवितेत इंग्रजी शब्द आला असेल आणि तो रुढ झालेला असेल तर काय हरकत आहे? कपबशीला कपबशी म्हणतो. टेबलला चौपाई म्हणत नाहीत, टेबलच म्हणतो. मराठीत एखाद्या गायकाने उत्तम गाणं म्हटलं तरीही त्याला वन्स मोअरच म्हणतात. पुन्हा एकदा, पुन्हा एकदा असं टाळ्या वाजवून कुणी म्हणत नाही. काही शब्द रुढ झाले आहेत. मुलांना त्या शब्दांची सवय झाली आहे. तरीही मी याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणार आहे आणि शक्यतो रुढ शब्द असले तरीही खात्री करा आणि मग वापरा असं सांगेन. जी तज्ज्ञमंडळी आहेत त्यात साहित्यिक आहेतच. एखाद्या लहान गोष्टीचा किती बाऊ करायचा? याचं भान प्रत्येकाने बाळगलं पाहिजे. वन्स मोअर हा रुढ शब्द आहे त्याला काही पर्याय नाही. तसंच आम्ही सगळ्यांना मराठी कंपलसरी केलं आहे.” असंही दीपक केसरकर म्हणाले.