राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अलीकडेच सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. केंद्र आणि राज्य सरकार सूडाचं राजकारण करत आहेत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. सुप्रिया सुळेंच्या टीकेवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मी त्यांना अत्यंत मान देतो. मी त्यांच्याविरोधात वक्तव्य करणार नाही, असं दीपक केसरकर म्हणाले. दरम्यान, त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सल्ला दिला आहे.
सुप्रिया सुळेंच्या टीकेबाबत विचारलं असता दीपक केसरकर म्हणाले, “सत्ता गेल्यानंतर लोक वेगवेगळं बोलत असतात. सुप्रिया सुळे माझ्या बहिणीसारख्या आहेत. त्या माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. पण आम्ही त्यांना अत्यंत मान देतो. तुम्ही जर मला सुप्रिया सुळे, अजित पवार किंवा शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य करा, असं म्हणत असाल तर मी त्यांच्याविरोधात वक्तव्य करणार नाही. कारण विचारांची लढाई असू शकते व्यक्तीश: कुणाचीही लढाई असू शकत नाही.
“उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला अत्यंत प्रेम आणि आदर आहे. पण ज्यावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीवर आरोप करत असता, तेव्हा समोरूनही उत्तरं द्यावी लागतात. उत्तरं देताना अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येतात. ज्यामुळे उद्धव ठाकरे यांचाही कमीपणा होण्याची शक्यता असते. म्हणून आदित्य ठाकरे यांनी आरोप करताना संयम बाळगला पाहिजे, असं मला वाटतं. आदित्य ठाकरे यांच्यासोबत माझे अतिशय चांगले संबंध होते. त्यांच्याबद्दलही आदर आहे. पण ते ज्यापद्धतीने ते बोलतात, त्यामुळे ते स्वत:चं नुकसान करतात. त्याचबरोबर ते ठाकरे कुटुंबाचंही नुकसान करतात. तसेच लोकांमध्ये त्यांचा असलेला आदरही कमी करत आहेत. म्हणून त्यांनी संयमाने बोलावं एवढाच सल्ला मी याप्रसंगी देऊ शकतो,” अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.