राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते हे आजही शरद पवार यांना भेटले. सलग दोन दिवस या सगळ्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. त्यामुळे नवं समीकरण घडणार का? याची चर्चा आता सुरु झाली आहे. प्रफुल्ल पटेल यांनीही आम्ही शरद पवार यांना समजवण्याचा प्रयत्न करतो आहोत असं सांगितलं आहे. तर दुसरीकडे मंत्री दीपक केसरकर यांनी शरद पवार अजित पवार मनोमीलनाविषयी एक सूचक वक्तव्य केलं आहे.
दीपक केसरकर यांनी काय म्हटलं आहे?
“अजित पवार आणि शरद पवार यांचं मनोमीलन व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना करु. मी सुद्धा सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसपासूनच केली आहे. काँग्रेसमध्ये सुरुवात केली आणि मग शरद पवारांसह राष्ट्रवादीत गेलो. मला वाटतं जर शरद पवार यांच्याकडे सगळ्यांनी आग्रह धरला तर निश्चितपणे त्यांचं सगळ्यांवर प्रेम आहे. त्या प्रेमापोटी ते कदाचित तयार होऊ शकतील. मात्र इतक्या मोठ्या माणसाच्या मनात काय? हे सांगता येत नाही” असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व अजित पवारांकडे हवं की सुप्रिया सुळेंकडे?” अमोल कोल्हेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले…
शरद पवार यांच्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला झाला पाहिजे इतकीच आमची इच्छा आहे. मात्र आम्ही त्यांच्याशी याविषयी चर्चा करु शकत नाही. ते स्वतः सत्तेवरही होते. त्यांना हे ठाऊक आहे की सत्तेवर असताना जी कामं होतात ती विरोधात असताना होत नाहीत. त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घ्यावा एवढी आमची अपेक्षा आहे. असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले असून त्यानुसार दोन प्रतोद, दोन विधिमंडळ गटनेते आणि इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती दोन्ही गटांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गट व शिंदे गटाप्रमाणेच सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती झाली आहे. त्यामुळे सोमवार अर्थात आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात नेमकं काय चित्र दिसणार? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. त्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी रविवारी दुपारी वाय. बी. चव्हाण सेंटरवर शरद पवारांची भेट घेतली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या!
हे पण वाचा- अजित पवार गटाचे सर्व आमदार दीड तास वाय. बी. सेंटरवर; शरद पवारांशी चर्चा, नेमकं आत घडलं काय? प्रफुल्ल पटेल म्हणतात…!
आज काय घडलं?
आज अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदारांनी वाय. बी. चव्हाण सेंटरवर भेट घेतली. यावेळी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरेही उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय? यासंदर्भात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीनंतर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.
“आज अजित पवार व विधिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी वाय बी चव्हाण सेंटरला आले होते. आम्ही सगळे इथे आलो. काल अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी इथे आलो होतो. काल रविवार असल्यामुळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधिमंडळाचं अधिवेशन चालू झाल्यामुळे बरेच आमदार आज इथे हजर होते. त्यामुळे आमदारांना शरद पवारांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही इथे आलो”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.