गृहखात्याकडूनही उत्तरे देण्यास टाळाटाळ; पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत तफावत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मम्मी, पप्पाला मारणारे हेच का ते पोलीस? अशी बालसुलभ शंका विचारणारी अवघ्या तीन वर्षांची कोवळी चिमुरडी प्रांजल गेले आठ दिवस अस्वस्थ आहे. राजकीय नेत्यांच्या मोटारीचा ताफा घरासमोर येतो काय, प्रश्न विचारले जातात काय, अन् या प्रश्नांच्या सरबत्तीत तिचा जन्मदाता कुठे या पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मात्र तिला मिळत नाही. या साऱ्या प्रकरणात सांगली पोलिसांवरील संशय बळावला आहे.

गेले आठ दिवस सांगली धुमसते आहे. मात्र याचे उत्तर देण्यास गृह विभाग बांधीलच नसल्यासारखा वागत आहे. अनिकेतला मारणारे हात आज गजाआड असले तरी गजाच्या लोखंडी सळ्या वाजवून घरचे जेवण हवे, पोलीस मॅन्युअल प्रमाणे भत्ता हवा असा आकांडतांडव करताना माझा श्वास कोंडला आहे मला सोडा ऐकायला कान बधिर झाले होते का? असे एक ना अनेक प्रश्न कुणाला विचारायचे? असा प्रश्न चिमुरडय़ा प्रांजलला पडला असला तरी मुर्दाड झालेल्या वर्दीकडे याचे उत्तर आजच्या घडीला तरी नाही हे त्रिवार सत्य.

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या छळछावणीत खाकी वर्दीतील माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य घडत असतान वरिष्ठ यंत्रणा काय झोपली होती की झोपेचे सेंग घेउन बसली होती? असा रास्त प्रश्न घेउन आज सांगलीकर तब्बल आठ दिवसांचा वेळ देउन रस्त्यावर उतरला. जर सांगलीकरांनी संयम दाखविला नसता तर बिहार आणि सांगली यांच्यात फरकच उरला नसता. ६ नोव्हेंबरच्या रात्री घडलेली घटना असताना आज आठ दिवस सांगलीकर संयमाने वागत आहेत. मात्र, या संयमाचीच परीक्षा बघण्याचे पोलीस दलातील वरिष्ठांनी ठरविले असावे असे दिसत आहे.

सुपारी देउन केलेला हा खून आहे असा साधा आरोप करून पहिल्याच दिवशी दिशाभूल का केली? अनिकेतला पोलीस ठाण्याच्या चार भिंतीत मारून त्याचे प्रेत आंबोलीच्या जंगलात नष्ट करण्याचा झालेला प्रयत्न हे सर्व आम सांगलीकरांना समजले ते पोलीसांना समजले  नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मग या पोलीस अधिकाऱ्यावर सांगलीकरांनी विश्वास का ठेवायचा? खुद्द भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांचीच दिशाभूल करण्याचे प्रयत्न करण्यात आले. गाडगीळ यांनीह पोरांना सांगितल्यासारखे मला सांगू नका, उद्या १२ वाजेपर्यंत हजर करा अन्यथा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली जाईल असे सांगताच घडलेली घटना सांगण्यात आली. अन्यथा पोलीसांच्या तावडीतून अनिकेतने पलायन केल्याचे पालुपद यंत्रणा सांगत होतीच.

अनिकेतच्या पलायनाचे पाप झाकले गेले असते तर दुसरा बळी हा ठरलेलाच होता. या मारहाणीचा एकमेव साक्षीदार अमोल भंडारी यालाही यमसदनाला धाडण्याचा विचार फौजदार युवराज कामटे यांने केला होताच. मात्र यातील सहभागी पोलीस अरुण टोणे याने एका प्रकरणात अगोदरच अडकलो आहे, दुसऱ्यात कशाला? असे सांगून परावृत्त केले असले तर, भविष्यात त्याचे जीवन कामटेच्या मेहरबानीवर उरले असते हे मान्यच करायला हवे.

कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितलेली कथा आणि प्रत्यक्षात घडलेले कथानक यामध्ये तफावत असल्याची साशंकता सांगलीकरांना आहे. कारण उपअधिक्षक छातीठोकपणे आपण कामटेच्या संपर्कात असल्याचे सांगत होत्या. याचवेळी कामटे अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मग्न होता. दुपारी भंडारीला निपाणीत पकडल्याचे डॉ. काळे सांगत असताना अधिक्षक दत्तात्रय शिंदे आमदारांना भंडारीला हुबळीत पकडल्याचे सांगत होते. हा गरमेळच काहीतरी लपविण्याचा आणि कोणाला तरी वाचविण्याचा असल्याचे निदर्शक मानले जात आहे. याच दिवशी आयजी नांगरे-पाटील सांगलीत असताना जतच्या दौऱ्यावर अधिक्षक आणि अतिरिक्त अधिक्षक शशीकांत बोराटे यांच्यासोबत गेले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन आरोपींनी रात्री कोठडीतून पलायन केले अशी माहिती त्यावेळी होती तर मग त्याचा खुलासा करण्याची गरज वरिष्ठांना का वाटली नाही?

आज सांगली पोलीस दल संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. समाजमाध्यमांत याचा रोष व्यक्त होत आहे. याचे शुध्दीकरण करण्याची गरज असताना सांगलीकरांच्या सहनशीलतेचा किती अंत पाहणार आहेत हा प्रश्न आहे. सक्षम अधिकारी दिल्याविना पोलीसांची गेलेली पत परत मिळणार नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र, पोलीस दलात केवळ सीआयडीकडे तपास दिला आहे, त्यांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे एवढेच पालुपद लावले आहे. कायद्याने अन्याय दूर होणार नसेल तर सामान्य माणूस अन्य पर्यायाच्या शोधात राहिल. मग इथे कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करून कोणी जर कुठे नेउन ठेवली दादांची सांगली असा प्रश्न दादांच्या जन्मशताब्दीच्या सांगतेला केला तर त्यात वावगे काय?

अनिकेतच्या हत्त्येप्रकरणी फौजदारांसह सहा जणांना अटक करण्यात आली असून आणखी सात पोलीसांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? कोण पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला का याची चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास कारवाईची तयारी शासनाने दर्शवली आहे. दोषींवर ठोस कारवाई होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. मात्र, दोषींवर कारवाईसाठी अखेपर्यंत पाठपुरावा केला जाईल.   – सुधीर गाडगीळ, आमदार