राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आज शिवसेनेत जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. येत्या आठ दिवसांमध्ये आपण राजीनामा देणार असून राष्ट्रवादीने सावंतवाडीत उमेदवार शोधावा असे केसरकर यांनी म्हटले.
ही लढाई नारायण राणे या व्यक्तीविरुद्ध नाही तर राणे या प्रवृत्तीच्या विरोधात आहे असं सांगत आपण राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राणेंच्याविरोधात यापुढेही लढत राहणार, असेही ते यावेळी म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी होणार आहे. या आघाडीत काँग्रेसचे नेते नारायण राणे असतील. सिंधुदुर्गात लोकसभा निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाली आहे, तीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार आहे. त्यापेक्षा सरळ शिवसेनेत जाण्याची तयारी करा असा सल्ला पदाधिकारी व कार्यकर्ते केसरकर यांना देत होते.

Story img Loader