राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत खालच्या भाषेत टीका केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. एका वृत्तावाहिनीशी बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द काढले आहेत. या विधानानंतर सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, राजकीय वातावरण तापलं आहे.

सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर करण्यात आली होती. त्यावर तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं. याबाबत औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिंशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भि**** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही खोके देऊ,” असे उत्तर सत्तार यांनी दिले होते.

हेही वाचा : अब्दुल सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांचा…”

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे. “शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कोणीही वाईट अथवा व्यक्तिगत बोलू नये. शिंदे गटाच्या वतीने सुप्रिया सुळे यांची दिलगिरी व्यक्त करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार यांना समज देतील. कोणत्याही महिलेचा अपमान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे,” असे दीपक केसरकर यांनी म्हटलं.

हेही वाचा : “२४ तासांत अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करावी, अन्यथा…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादीचा थेट इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसने अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर “राजीनामा मागण्याचा त्यांना अधिकार आहे का? देशद्रोहाचे आरोप आणि तुरुगांत असणाऱ्यांचे राजीनामे राष्ट्रवादीने दिले नाहीत. एखाद्या वक्तव्यावरून राजीनामा मागतात हे कितपत योग्य आहे. तुम्ही निषेध करा, माफी मागण्याची मागणी करा. त्यांच्याकडून चुकीचे वक्तव्य झालं असेल, तर माफी मागण्यात काही गैर नाही,” असेही दीपक केसकर यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader