Uddhav Thackeray Latest News News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काल (२३ नोव्हेंबर) रोजी जाहीर झाले आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आघाडी अशी लढत पाहायला मिळालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महायुतीने २८८ पैकी २३४ जागा मिळवल्या आहेत, तर भाजपा हा १३२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला १० जागांवर समाधान मानावे लागले आहे. यादरम्यान शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पराभवाचे एक वेगळेच कारण सांगितले आहे. उद्धव ठाकरेंनी एखाद्याच्या श्रद्धेची चेष्टा केल्याने त्यांना त्याची शिक्षा मिळाल्याचे केसरकर म्हणाले आहेत.
दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
क
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मिळालेल्या जागांबद्दल पीटीआयशी बोलताना केसरकर म्हणाले की, “खरा बाळासाहेबांचा वारस कोण आहे? हे जनतेने सिद्ध करून दाखवलं. बाळासाहेबांचा वारस हा फक्त एक शिवसैनिकच असू शकतो आणि त्यांची (बाळासाहेब ठाकरे) इच्छा होती की माझा सर्वसामान्य शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा. तो बनला आणि त्याने लोकांची कामेदेखील करून दाखवली. त्यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद त्यांच्यासोबतच आहे”.
“माझ्या मतदारसंघात देखील उद्धव ठाकरे आले होते. मी साईबाबांचा भक्त आहे. तर उद्धव ठाकरेंनी त्याची चेष्टा केली. खरंतर जेव्हा ते मुख्यमंत्री झाले होते तेव्हा मी त्यांना साईबाबांची शाल दिली होती. त्यांच्या पत्नी म्हणाल्यादेखील होत्या की तुम्ही शाल पांघरली आणि ते (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्री बनले”.
“तेच उद्धव ठाकरे येथे येऊन काही बोलले तर…हेही एक महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे त्याची शिक्षा त्यांना देण्यात आली. आज त्यांना किती जागा मिळाल्यात पाहा, इतक्या जागा लढून देखील ते काहीच करू शकले नाहीत. भारत आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे की, आपण देवावर श्रद्धा ठेवतो. त्याची चेष्टा करत नाहीत. त्यांनी याची चेष्ठा केली आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. शिक्षाही अशी मिळाली की ते आता पुन्हा कधीच स्वत:ला शिवसेना म्हणवू शकणार नाहीत”, असेही केसरकर यावेळी म्हणाले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे) गटाचे दीपक केसरकर विरुद्ध ठाकरेंच्या सेनेचे राजन तेली अशी लढत होती. ज्यामध्ये केसरकर विजयी झाले आहेत. राजन तेली यांनी निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच भाजपा सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यंदाच्या निवडणुकीत दीपक केसरकरांनी राजन तेली यांना तब्बल ३९ हजार ८९९ मतांनी हरविले.