मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद धुमसत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील ४० गावांवर आपला दावा सांगितला आहे. बोम्मई यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. महाराष्ट्रातील सरकार काहीच भूमिका घेत नाही, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांवर भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांकडून केलेल्या विधानावरून महाविकास आघाडीचे नेते सरकारवर निशाणा साधत आहे.
याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबरला मुंबईत भव्य-दिव्य मोर्चा काढला जाणार आहे. याबाबतची बैठक आज पार पडली या बैठकीनंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडीवर टीकास्र सोडलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगितला असताना महाविकास आघाडीचे नेते राजकारण करत आहेत. ते एकजूट होत नसल्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अशी विधानं करण्याची हिंमत झाली, अशी टीका केसरकरांनी केली.
‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना दीपक केसरकर म्हणाले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण करणं हा महाविकास आघाडीचा गुणधर्म आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वांनाच अभिमान आहे. त्यामुळे आम्ही जनतेच्या भावना आहेत, राज्यपाल आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे आमच्याच आंदोलनामुळे काहीतरी घडलं, अशी भूमिका घेणं चुकीचं आहे. कुठलंही आंदोलन करावं की करू नये? हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.”
हेही वाचा- “अंगावर आले तर शिंगावर घ्या, वकिलांची फौज उभी करतो” राज ठाकरेंचे मनसैनिकांना थेट आदेश
“पण ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमावाद सुरू आहे. हे आजपर्यंत सगळं शांत होतं. सीमा भागातील आमच्या नागरिकांना आम्ही जेव्हा सुविधा दिल्या, तेव्हा कर्नाटकच्या पोटात दुखायला लागलं. तोपर्यंत त्यांना काहीही वाटत नव्हतं. कारण आतापर्यंतच्या सरकारने सीमाभागातील आपल्या नागरिकांच्या सुविधा बंद केल्या होत्या किंवा अंमलबजावणी करणं थांबवलं होतं. म्हणजेच आपल्या माणसांची काळजी करायची नाही. दुसऱ्यांनी कोणी काळजी केली तर त्यावर प्रतिक्रिया देत बसायचं” अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.