Deepak Kesarkar : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये पार पडला. यानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी मंगळवारी उद्धव ठाकरे हे देखील विधीमंडळात दाखल झाले होते. मात्र, यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट का घेतली? या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? असे तर्कवितर्क लावले जाऊ लागले. मात्र, त्यानंतर स्वत: उद्धव ठाकरे यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण देत ही भेट सदिच्छा असल्याचं सांगितलं. मात्र, या भेटीसंदर्भात बोलताना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे. “उद्धव ठाकरे यांनी आधीच अशी भेट घेतली असती तर शिवसेनेचे दोन भाग झाले नसते”, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

हेही वाचा : अमित शाहांवरील टीकेला पंतप्रधान मोदींनी दिलं प्रत्युत्तर; डॉ. आंबेडकरांविषयीच्या विधानावरून विरोधकांवर हल्लाबोल!

दीपक केसरकर काय म्हणाले?

“सरकार चांगलं चाललं पाहिजे. यावर नेहमी चर्चा झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षा मोठ्या आहेत. सरकार चांगलं चालवण्यासाठी काही सूचना असतात. त्यामुळे ते (एकनाथ शिंदे) कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना देत असतात. महाराष्ट्रात मी जवळपास अडीच वर्ष शिक्षण खातं सांभाळलं. मुलांच्या हितासाठी जे काही चांगले निर्णय घेतले. ते निर्णय तसेच सुरु राहिले पाहिजेत. कारण आपल्याला पुढची पिढी चांगली घडवायची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनाही महाराष्ट्राच्या विकासाची दृष्टी आहे”, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये भेट घेतली. त्या भेटीबाबत बोलताना दीपक केसरकर यांनी म्हटलं की, “आधी जर हे केलं असतं तर शिवसेनेचे दोन भाग झाले नसते. आधी देवेंद्र फडणवीस यांचे फोन देखील उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले नव्हते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार सोडला. एकनाथ शिंदे यांची दुसरी कोणतीही मागणी नव्हती. एकनाथ शिंदेंची एकमेव मागणी होती की आपण हिंदुत्वाचा विचाराबरोबर जाऊ. काँग्रेस बरोबर जायला नको. पण उद्धव ठाकरे यांनी तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली असती तर हे सर्व घडलंच नसतं. देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांना कितीतरी फोन केले होते. पण आता खूप उशीर झाला. आता महायुतीचं सरकार आलंय”, असं दीपक केसरकरांनी म्हटलं आहे.

Story img Loader