Deepak Kesarkar on Oath Taking Ceremony : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची जोरदार तयारी सुरू असून शपथविधीच्य कार्यक्रमासाठीही तयारी सुरू झालीय. ही तयारी पाहण्याकरता अनेक भाजपा नेते जाऊन आले. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान येथे हा सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, ही तयारी पाहण्याकरता आम्हाला बोलावलं असतं तर आम्हीही आलो असतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली. ते झी २४ तासशी बोलत होते.
शपथविधीची तयारी सुरू असताना ते पाहण्याकरता तुम्ही जाणार का? असा प्रश्न दीपक केसरकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “आम्हाला बोलावलं तर नक्कीच जाऊ. आम्हाला माहिती नव्हतं. लोकांमध्ये गैरसमज नको. महायुतीत आम्ही सर्वचजण आनंदी आहोत. शेवटी महायुतीचं सरकार येतंय.”
हेही वाचा >> Avinash Jadhav : अवघ्या २४ तासांत अविनाश जाधव यांनी राजीनामा घेतला मागे; म्हणाले, “माझ्याकडे पक्षात…”
“ही तयारी सरकारी यंत्रणेतर्फे केली जाते. ज्या पक्षाचं सरकार आलंय, त्या पक्षाचे लोक जाऊन तयारीची पाहणी करतात, जेणेकरून काही कमतरता राहू नये. शेवटी हा कार्यक्रम पक्षाचा असतो. त्यांनी पाहणी केली आणि आम्ही केली हे सारखंच आहे. पाहणी केली याचा आनंद आहे. भाजपा आमचा सर्वांत मोठा पक्ष आहे. तो आमचा मोठा भाऊ आहे”, असंही दीपक केसरकर म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या सर्व बैठका रद्द
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी, त्यांची प्रकृती पुर्णपणे बरी झालेली नाही. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेतली असून यामुळे त्यांच्या सर्वच बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.
राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असले तरी आठ दिवस उलटूनही मुख्यमंत्री ठरू शकलेला नाही. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. एकीकडे राज्यातील सरकार स्थापनेवरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असतानाच, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे.