शिवसेनेतील बंडखोरीनंतर सुरू झालेला शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष अंधेरी पोटनिवडणुकीमुळे आणखी तीव्र होताना दिसून येत आहे. रोज दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान, काल भाजपाचे उमेवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिंदे गटातील महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटातील काही समर्थकांनी ‘गद्दार, ५० खोके एकदम ओक्के’ अशी घोषणाबाजी केली. यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त करत दोन दिवसांत ‘कोण खोके घेतं’ याचा खुलासा करणार असल्याचा इशारा दिला. दादर येथील स्वामीनारायण मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
हेही वाचा – Andheri Bypoll: “पक्षाशी निष्ठावंत असलेले सगळे…” प्रचाराला सुरुवात करताच ऋतुजा लटकेंचं विधान, म्हणाल्या…
काय म्हणाले दीपक केसरकर?
“आज राज्यात ज्याप्रकारे आरोप केले जात आहेत किंवा घोषणाबाजी केली जात आहे, ती योग्य नाही. ही महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती नाही. काल मी अंधेरी पोटविडणुकीसाठी अर्ज भरायला गेलो असताना ज्याप्रकारे वर्तन केलं गेलं, ते अतिशय दुर्देवी होती. अशी घोषणाबाजी करून राज्याचा विकास होत नाही. महाराष्ट्राचा विकास कसा करायचा हे आम्ही आमच्या कामाने दाखवून देऊ”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.
दरम्यान, दिलीपमामा लांडे आणि शिंदे गटातील नेत्यांना ‘गद्दार’, ‘खोकासून’, ‘५० खोके एकदम ओक्के’ वगैर बोललं जातं. यावरूनही दीपक केसरकर यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “येत्या दोन दिवसांत मी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना उत्तर देणार आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला चांगले कोण आणि वाईट कोण हे कळेल. कोण खोके घेतं आणि आपल्या विराचांसाठी लढा कोण देतं, हे महाराष्ट्राला माहिती झालं पाहिजे”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – विश्लेषण : उद्धव ठाकरेंसाठी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आव्हानात्मक कशी ठरणार?
दसरा मेळाव्याप्रमाणेच ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमावरून ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष बघायला मिळतो आहे. त्यावरूनही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “हा सर्व प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे. प्रत्येक वेळी आमच्यावर सत्तेचा दुरुपयोग करतो, हे आरोप लावणं चुकीचं आहे. जर आता ठाण्यात दिवाळी पहाटचे दोन कार्यक्रम होत असतील, तर ते शांततेत पार पडायला हवे”, असेही ते म्हणाले.