कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य करताना दिसत आहे. रविवारी ( १७ सप्टेंबर ) गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर ( शिंदे गट ) टीका केली होती. धनुष्यबाणापेक्षा रॉकेट चालतात. माझ्याकडे रॉकेट आहे, असं वक्तव्य गणपत गायकवाड यांनी केलं होतं. याला मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणपत गायकवाड काय म्हणाले?

“धनुष्यबाणापेक्षा रॉकेट चालतात. माझ्याकडे रॉकेट आहे. तेही आता चांगले काम करुन बाणाला उत्तर देऊ शकते. कल्याण पूर्वच्या जनतेचे हाल करणाऱ्यांचं आता नाव घेत नाही. मात्र, पुन्हा छेडण्याचा प्रयत्न केला, तर तेव्हा नाव घेऊन सांगेन. मी कोणाच्या बापाला बाप म्हणत नाही. पण, माझा निधी कोणाच्या कोणाच्या टेबलावर अडवून ठेवला होता, हेही जनतेला सांगणार आहे. कल्याण पूर्वमध्ये १२९ कोटींची कामे मी मंजूर करून आणली होती. परंतू, दुसऱ्यांचं नाव लावून ही कामे चालू आहेत,” असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला होता.

हेही वाचा : “एकदा लोकसभेची निवडणूक होऊद्या, तुमच्या प्रत्येक…”, भाजपा आमदाराचा श्रीकांत शिंदेंना इशारा

“लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक आरोपांचं उत्तर देणार”

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला निधी आणत मंजूऱ्या मी घेतल्या. पण, तिथेही श्रेय घेण्यासाठी काहीजण पुढे आले. आपल्याला निवडणुकीत परत त्यांच्याबरोबर फिरायचं असल्याने काही गोष्टी बोलत नाही. एकदा लोकसभेची निवडणूक होऊद्या. माझ्यावर जेवढे आरोप करायचे आहेत, तेवढे करा. तुमच्या प्रत्येक आरोपाचं उत्तर देण्याची ताकद माझ्यात आहे. तुम्ही मला उत्तर देऊ शकणार नाही,” असं म्हणत गणपत गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

हेही वाचा : “घोडा मैदान समोर आहे, कोण…”, बच्चू कडूंचा रवी राणांना सूचक इशारा

“ही कपातली वादळं”

यावर मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे. “रॉकेट असलं तरी त्याचा वापर गणपतीत होतो. पण, खालच्या कुरबुऱ्या वर टिकत नाहीत. वरती फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आहे. सगळेजण पंतप्रधान मोदींचं नेतृत्व मानतात. भारताला मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे. ही तात्पुरती कपातली वादळं आहेत. एका क्षणात कपातली वादळं थांबतात. निवडणुकीत भाजपा-सेना एकत्र काम करताना दिसतील,” असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak kesarkar reply bjp mla ganpat gaikwad over shivsena and shrikant shinde ssa